ओला, उबेर व इतर ॲपआधारित वाहनसेवांमध्ये अतिरिक्त भाड्याची मागणी किंवा गैरवर्तन झाल्यास तक्रार करा : डॉ. नीलम गोऱ्हे
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा; तक्रारदार महिलांची नावे गोपनीय ठेवण्याची ग्वाही
पुणे : ओला, उबेर आणि इतर ॲपआधारित वाहनसेवांमधून प्रवास बुक केल्यानंतर अतिरिक्त भाड्याची मागणी करणे, मीटरनुसार पैसे देण्याचा आग्रह धरणे, प्रवाशांशी गैरवर्तन करणे किंवा त्यांना वाहनातून उतरवून देणे, अशा प्रकारांबाबत प्रवाशांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) तक्रार करावी, असे आवाहन शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या व माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.
पुण्यातील काही महिला प्रवाशांनी, त्यामध्ये एका महिला पत्रकाराचाही समावेश असून, रात्रीच्या वेळी ओला प्रवासादरम्यान आलेल्या अडचणींबाबत डॉ. गोऱ्हे यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. ॲपवर दर्शविलेल्या भाड्यानुसार प्रवास बुक केल्यानंतर संबंधित चालकांनी मीटरनुसार भाडे देण्याचा आग्रह धरल्याचे महिलांनी सांगितले. बुकिंगच्या वेळी ठरलेल्या भाड्यानुसारच पैसे देण्याची भूमिका घेतल्यानंतर काही महिलांना वाहनातून उतरवून देण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
या प्रकारांची दखल घेऊन डॉ. गोऱ्हे यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक तसेच सचिव राजेश नार्वेकर यांच्याशी चर्चा केली. प्रवाशांच्या तक्रारींच्या अनुषंगाने शक्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन मंत्री सरनाईक यांनी दिल्याचे त्यांनी नमूद केले.
“रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांना वाहनातून उतरवून देणे ही त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. बुकिंगच्या वेळी एक रक्कम दाखविणे आणि प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी वेगळ्या भाड्याचा आग्रह धरणे, यामुळे प्रवाशांची अडवणूक होते. अशा तक्रारींची चौकशी होऊन योग्य तोडगा निघणे आवश्यक आहे,” असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
अशा प्रकारांच्या तक्रारींसाठी ८२७५३३०१०१ हा स्वतंत्र संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ओला, उबेर किंवा इतर ॲपआधारित वाहनसेवांचा वापर करणाऱ्या महिला तसेच पुरुष प्रवाशांनी तक्रार करताना वाहन क्रमांक, घटनेची तारीख, वेळ, ठिकाण, बुकिंगचा तपशील आणि उपलब्ध असल्यास भाड्याचे स्क्रीनशॉट यांसह माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्रवाशांनी आरटीओकडे तक्रार करण्याबरोबरच आपल्या कार्यालयाकडेही लेखी तक्रारी द्याव्यात. प्राप्त तक्रारींच्या आधारे संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी आणि परिवहन विभागासोबत बैठक घेऊन भाड्यातील तफावत, प्रवाशांची अडवणूक आणि चालक-प्रवासी वाद यांवर तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
“महिलांनी न घाबरता आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात द्याव्यात. तक्रारदार महिलांची नावे गोपनीय ठेवली जातील आणि त्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी प्रयत्न केले जातील,” अशी ग्वाही डॉ. गोऱ्हे यांनी दिली.





















