*ए विभागातील साबू सिद्दिक मार्ग, मुसाफिरखाना व सभोवतालच्या परिसरातील ५२ अनधिकृत स्टॉल्सचे निष्कासन*
*आज सलग दुस-या दिवशी धडक कारवाई*
ए विभागातील साबू सिद्दिक मार्ग, मुसाफिरखाना व मनिष मार्केट परिसरातील एकूण ५२ अनधिकृत स्टॉल्सवर आज, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी, परिरक्षण व अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान ताडपत्री, बांबू, लोखंडी पाईप व लोखंडी पत्र्यांच्या साहाय्याने उभारण्यात आलेली तात्पुरत्या स्वरूपाची बांधकामे तसेच पक्क्या स्वरूपातील लोखंडी स्टॉल्स असलेले अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा लवंगारे यांच्या आदेशानुसार आणि उप आयुक्त (परिमंडळ – १) श्रीमती चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ए विभागातील अधिकारी व कामगारांनी ही निष्कासन कारवाई केली.
उप आयुक्त श्रीमती चंदा जाधव म्हणाल्या की, माननीय लोकप्रतिनिधींसमवेत मंगळवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘ए’ विभागातील साबू सिद्दीक मार्ग, मुसाफिरखाना परिसराची पाहणी केली. या पाहणी दौ-यास ‘ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. उज्वल इंगोले यांच्यासह सहाय्यक अभियंता (परिरक्षण), वरिष्ठ निरीक्षक (अनुज्ञापन), तसेच वरिष्ठ निरीक्षक (अतिक्रमण निर्मुलन) विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या पाहणी दौऱ्यात माननीय लोकप्रतिनिधींनी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने तसेच महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या संकल्पनेतील ‘पादचारी प्रथम’ मोहिमेंतर्गत बुधवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवित ९२ अनधिकृत स्टॉल्सवर निष्कासन कारवाई करण्यात आली होती. आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सलग दुस-या दिवशी साबू सिद्दिक मार्ग, मुसाफिरखाना व मनिष मार्केट परिसरातील ५२ अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली. ताडपत्री, बांबू, लोखंडी पाईप व लोखंडी पत्रे यांच्या सहाय्याने केलेले तात्पुरत्या स्वरुपाचे बांधकाम आणि पक्के बांधकामदेखील निष्कासित करण्यात आले.
या कारवाई दरम्यान माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याचे ५ फौजदार, १० पोलीस अंमलदार असा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
*




















