Home मुंबई महाराष्ट्राच्या लोककलेतील दिमाखदार पर्वाची अखेर – सुनेत्रा अजित पवार*

महाराष्ट्राच्या लोककलेतील दिमाखदार पर्वाची अखेर – सुनेत्रा अजित पवार*

36
0

महाराष्ट्राच्या लोककलेतील दिमाखदार पर्वाची अखेर – सुनेत्रा अजित पवार*

*ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली*

मुंबई, दि. १२ ऑक्टोबर – मराठी चित्रपट, नाट्य आणि लोककलेच्या क्षेत्रात आपल्या समर्थ अभिनयाने आणि बहारदार लावणीने स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या लोककलेतील एक दिमाखदार पर्व संपले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मधू कांबीकर यांनी महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या लोककलेचा अस्सल बाज आयुष्यभर जपला. लोककलेच्या व्यासपीठावर सुरू झालेला त्यांचा प्रवास मराठी नाटक आणि चित्रपटसृष्टीपर्यंत पोहोचला.आपल्या सहजसुंदर अभिनयाने, वैशिष्ट्यपूर्ण नृत्यशैलीने आणि लावणीच्या प्रभावी सादरीकरणाने त्यांनी रसिकांच्या मनावर अनेक दशके अधिराज्य गाजवले.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मालेगाव येथे जन्मलेल्या मधू कांबीकर यांना बालपणापासूनच लोककलेचा समृद्ध वारसा लाभला. अत्यंत लहान वयात रंगमंचावर पाऊल ठेवत त्यांनी आपल्या कलेच्या बळावर स्वतंत्र स्थान निर्माण केले. लावणी आणि तमाशासारख्या महाराष्ट्राच्या पारंपारिक लोककलांना व्यापक प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. चार दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी ७५ हून अधिक चित्रपटांसह अनेक नाटकांमधून आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाची छाप उमटवली.

ग्रामीण महाराष्ट्रातील लोककलेच्या व्यासपीठापासून चित्रपटसृष्टीपर्यंतचा त्यांचा प्रवास हा जिद्द, संघर्ष आणि कलेवरील निष्ठेचा प्रेरणादायी प्रवास होता. आपल्या कलेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लावणीची परंपरा समृद्ध केली. त्यांचे कलाक्षेत्रातील योगदान आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांच्या स्मरणात कायम राहतील.

मधू कांबीकर यांच्या निधनाने मराठी चित्रपट, नाट्य आणि लोककलेच्या क्षेत्रातील एक ज्येष्ठ, प्रतिभावंत आणि अस्सल कलावंत हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. मधू कांबीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशी भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here