Home मुंबई *‘सुधामंजिरी’ सोसायटी ही पनवेलकरांच्या स्वयंपुनर्विकासाचा विश्वास*

*‘सुधामंजिरी’ सोसायटी ही पनवेलकरांच्या स्वयंपुनर्विकासाचा विश्वास*

72
0

*‘सुधामंजिरी’ सोसायटी ही पनवेलकरांच्या स्वयंपुनर्विकासाचा विश्वास*

*पनवेलमधील भूमिपूजन सोहळ्यात आ. प्रवीण दरेकरांचे प्रतिपादन*

पनवेल – सुधामंजिरी सोसायटी ही पनवेलकरांच्या स्वयंपुनर्विकासाचा विश्वास आहे. तुमची इमारत बघून संपूर्ण पनवेल महापालिका क्षेत्रात स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून चांगल्या इमारती उभ्या राहतील, असे प्रतिपादन भाजपा गटनेते व महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले.

पनवेलमधील सुधामंजिरी सोसायटी या पहिल्या स्वयंपुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन आज नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर आ. प्रवीण दरेकर यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी भाजपा आमदार विक्रांत पाटील, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, नंदू पटवर्धन, सुधामंजिरी सोसायटीचे अध्यक्ष माधव मोरे, सचिव समीर पंडित, खजिनदार अनिल गडकरी यांसह सोसायटीतील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. दरेकर म्हणाले कि, स्वयंपुनर्विकासाची मी जी काही गुढी उभारली, राज्यातील जनतेला देवाभाऊंच्या माध्यमातून जे काही स्वप्न दाखवले तो स्वयं पुनर्विकास मुंबईत गती घ्यायला लागला. आज जवळपास १६०० इमारतींचे प्रस्ताव आले असून त्यातील ४६ सोसायट्यांना आम्ही कर्ज दिले आणि २१ इमारतींमध्ये लोकं राहायला गेली. एवढी जोरात स्वयंपुनर्विकासाची मोहीम मुंबईत सुरु आहे. पनवेलमध्ये या मोहिमेची सुरुवात होत असल्याचा आनंद आहे. मुंबईनंतर पनवेलमध्ये स्वयंपुनर्विकासाचे नवे पर्व सुरु झाल्याचेही आ. दरेकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले कि, आपण आपली इमारत विकासकाला तो पैसे आणि परवानग्या मिळवून देतो म्हणून बांधायला देतो. मी निर्णय केला कि पैशांची व्यवस्था करू. त्यासाठी मुंबई बँकेमार्फत गृहनिर्माण संस्थांना कर्ज देण्याचे धोरण तयार केले. परवानग्या मिळवण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मुंबईतील नेस्को येथे गृहनिर्माण संस्थांची मोठी परिषद घेतली. त्या परिषदेत स्वयंपुनर्विकासाला गती देण्यासाठी २० वेगवेगळ्या मागण्या केल्या. त्यापैकी १८ मागण्यांचे शासन निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज स्वयं पुनर्विकास मुंबईत गती घेत आहे. मुंबईतील स्वयंपुनर्विकासाचे लोन बाहेर पसरले पाहिजे ही माझी भूमिका होती. आज पनवेलमध्ये ती साकार होताना दिसतेय यापेक्षा दुसरा कुठलाच आनंद नसल्याचेही दरेकर म्हणाले.

आ. दरेकर पुढे म्हणाले कि, स्वयं पुनर्विकासासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे लागणार आहेत. राज्य सहकारी बँक पैसे देतेय. एनसीडीसीच्या माध्यमातून केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे एक हजार कोटी मागितले आहेत. परंतु त्याहीपेक्षा पैसे लागणार आहेत. सर्वसामान्य माणूस मला स्वतःच मोठे घर मिळणार आल्याने स्वयं पुनर्विकासाकडे वळला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ‘मित्रा’ नावाच्या संस्थेला स्वयं पुनर्विकासासाठी २५ हजार कोटी उभे करण्याचा प्रस्ताव दिला आहे. पैशांची अडचण येणार नाही. स्वतः महापौर या कार्यक्रमाला उपस्थित असल्याने पनवेल महापालिकेतही तुम्हाला अडचण येणार नाही. तुम्हाला जिथे अडचण येईल तेव्हा आम्हाला सांगा आम्ही तात्काळ मदत करू, असेही आ. दरेकरांनी उपस्थितांना आश्वासित केले.

आमदार विक्रांत पाटील यांना आवाहन करत दरेकर म्हणाले कि, तुम्ही पनवेलमध्ये स्वयं पुनर्विकासाची मोहीम सुरु करा. जी मदत लागेल ती १०० टक्के केली जाईल. पैशाची व्यवस्था आम्ही करू, तुम्ही पुढाकार घ्या. कारण सर्वसामान्य माणसाचे मोठे घर असावे यापेक्षा दुसरे कुठलेच स्वप्न नसते. ते स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून मिळत असेल तर दुसरे चांगले काम असू शकत नाही.

*स्वयं पुनर्विकास हा मध्यमवर्गीयांसाठी*

आ. दरेकर म्हणाले कि, स्वयं पुनर्विकास हा मध्यमवर्गीयांसाठी आहे. मुख्यमंत्रीही याकडे एक ध्यास म्हणून पाहताहेत. जी मदत लागेल ती करताहेत. माझ्या अध्यक्षतेखाली प्राधिकरण तयार केले. दरेकर समिती नेमली. माझ्या समितीचा अहवाल जसाच्या तसा स्वीकारला. राज्यात आज मोठ्या प्रमाणावर स्वयं पुनर्विकास होतोय. मुंबईत ज्या १८ सवलती आहेत त्या पनवेलमध्येही लागू करून घ्याव्या लागतील. डीसीपीआरमध्ये स्वयं पुनर्विकासाचा अंतर्भाव करावा लागेल. मुंबईला स्वयं पुनर्विकासाच्या ज्या सवलती दिल्या आहेत त्या इतर मोठ्या शहरांतही लागू कराव्यात अशी मागणी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात करू आणि मुख्यमंत्र्यांकडून तसा निर्णय करून घेऊ, असा विश्वासही यावेळी आ. दरेकरांनी दिला.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here