*’रेड रन २०२६’ मॅरेथॉनचा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते शुभारंभ*
*‘Run To End AIDS’ मोहिमेत ५०० हून अधिक महाविद्यालयीन युवक-युवतींचा सहभाग*
*विजेत्या खेळाडूंची बिहार येथील राष्ट्रीय पातळीवरील ‘रेड रन मॅरेथॉन’साठी निवड*
निरोगी आणि सक्षम युवा पिढी हेच देशाचे भविष्य असून, समाज निरोगी ठेवण्यासाठी सक्रिय जीवनशैली आणि आरोग्यविषयक जागृती ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आज (दिनांक ४ ऑक्टोबर २०२६) केले.
मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेमार्फत (MDACS) ‘Run To End AIDS’ या संकल्पनेअंतर्गत मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ४ किलोमीटर अंतराची ‘रेड रन २०२६’ मॅरेथॉन स्पर्धा आज सकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आली होती. मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांच्या हस्ते ध्वज दाखवून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी स्पर्धक धावपटू आणि नागरिकांना मार्गदर्शन करताना महापौर श्रीमती तावडे या बोलत होत्या.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक तथा महानगरपालिकेचे उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, ॲक्वर्थ कुष्ठरोग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. (श्रीमती) अमिता पेडणेकर, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजयकुमार करंजकर, उपसंचालक श्री. उमेश घुगे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी, धावपटू स्पर्धक तसेच विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी महापौर रितू तावडे म्हणाल्या की, मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नसून आपल्या सर्वांच्या स्वप्नांची आणि अथांग ऊर्जेची भूमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका नागरी तसेच पायाभूत सुविधा देण्यासोबतच उत्तम व सक्षम सार्वजनिक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सातत्याने कटिबद्ध आहे. एचआयव्ही आणि एड्स रोखणे, त्यावर नियंत्रण मिळवणे आणि समाजात जागृती निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था करत आहे. एचआयव्ही/एड्सचा प्रतिबंध आणि मुंबईचा सर्वांगीण विकास हा केवळ प्रशासनाच्या प्रयत्नांनी पूर्ण होऊ शकत नाही, तर त्यासाठी नागरिक आणि तरुणाईचा सक्रिय सहभाग मोलाचा आहे, असे त्यांनी नमूद केले.
मॅरेथॉन स्पर्धेविषयी बोलताना महापौर तावडे म्हणाल्या की, ही स्पर्धा म्हणजे केवळ धावणे नसून आरोग्य, शिस्त, आत्मविश्वास आणि सकारात्मक जीवनशैलीची एक मोठी चळवळ आहे. आज या स्पर्धेत कोणी जिंकेल तर कोणी शिकेल; पण जिंकण्यापेक्षाही एका उदात्त हेतूसाठी एकत्र येऊन धावणे आणि या जनजागृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे अधिक महत्त्वाचे आहे. ‘निरोगी युवक, निरोगी शहर’ हा मंत्र आपण सर्वांनी अंगीकारला पाहिजे, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी केले.
मुंबई महानगरात युवक-युवतींमध्ये एचआयव्ही/एड्स संदर्भात व्यापक जनजागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या सुरळीत आयोजनासाठी संस्थेचे २०० हून अधिक कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) स्वयंसेवक संपूर्ण धावमार्गावर कार्यरत होते.
सदर स्पर्धेचे नियोजन व आयोजन राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना (नॅको, नवी दिल्ली) चे अतिरिक्त सचिव व महासंचालक डॉ. राकेश गुप्ता तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
‘रेड रन २०२६’ स्पर्धेतील विजेत्या युवक-युवतींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या सर्व विजेत्या धावपटूंना राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या (NACO) वतीने ऑक्टोबर २०२६ मध्ये बिहार येथे आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील ‘रेड रन मॅरेथॉन’ स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
तसेच, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेमार्फत महानगरपालिका शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या ‘किशोरवयीन शिक्षण कार्यक्रम’ अंतर्गत आयोजित प्रश्नमंजूषा स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही या सोहळ्यात सन्मान करण्यात आला. शालेय स्तरावर १२ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडलेल्या या उपक्रमाची उपांत्य व अंतिम फेरी ११ सप्टेंबर २०२६ रोजी संपन्न झाली होती.
सद्यस्थितीत मुंबईतील १९० महाविद्यालयांमध्ये ‘रेड रिबन क्लब’च्या माध्यमातून आणि २५० महानगरपालिका शाळांमधून विद्यार्थ्यांपर्यंत एचआयव्ही/एड्स प्रतिबंधात्मक जनजागृती केली जात आहे.
***






















