*सातारा जिल्ह्याचे उबाठा गटाचे संपर्क प्रमुख शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश*
*मुंबई, दि. ३० :-* सातारा जिल्ह्याचे उबाठा गटाचे संपर्क प्रमुख आणि माण-खटाव जिल्हा बँकेचे संचालक *शेखर गोरे* यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. उपमुख्यमंत्री *एकनाथ शिंदे* यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आज राज्यात विकासाला गती देत आहे. २०२२ साली ऐतिहासिक उठावानंतर अडीच वर्षे राज्याचा सर्वांगीण विकास केला. लाडकी बहीण सारख्या लोककल्याणकारी योजनांमुळे २०२४ साली जनतेने महायुतीच्या २३४ आमदारांना विजयाची पावती दिली.”
“शेखर गोरे यांनी भगवा हाती घेऊन शिवसेनेवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,” अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. “गोरे यांच्यामुळे सातारा जिल्ह्यात, विशेषतः माण-खटाव भागात शिवसेनेची घोडदौड जोरात सुरू होईल,” असेही ते म्हणाले.
यावर शेखर गोरे म्हणाले, “कालच मी शिंदे साहेबांना भेटलो आणि आज पक्षप्रवेश होत आहे. मी ज्या पक्षात गेलो त्या पक्षासाठी पूर्ण जोमाने काम केले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्व पक्ष एकत्र येऊनही मी संचालक झालो. आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. तुम्हाला जेवढी शिवसेना वाढवायची आहे, तेवढी मी सातारा जिल्ह्यात नक्की वाढवून दाखवेन.”
यावेळी माण-खटाव तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
—






















