*क्लस्टरमध्ये घरांची नाही, ‘जीवनाची पुनर्बांधणी’; २३ सुविधांतून रचणार नव्या ठाण्याचा पाया – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
*सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन; ६ हजार कुटुंबांना हक्काचे घर मिळणार*
*ठाणे, दि. २३ सप्टेंबर -* ठाण्यातील क्लस्टर पुनर्विकास म्हणजे केवळ जुन्या घरांच्या जागी नवीन इमारती उभारणे नव्हे, तर हजारो कुटुंबांच्या ‘जीवनाची पुनर्बांधणी’ आहे. ६ हजार कुटुंबांना सुरक्षित, दर्जेदार घरे देतानाच २३ नागरी सुविधा, रोजगाराच्या संधी आणि नियोजित टाऊनशिप उभारून नव्या ठाण्याचा पाया रचत आहोत, असा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर क्लस्टर योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
सुमारे २० हेक्टर म्हणजेच ५० एकर परिसरात विकसित होणाऱ्या या क्लस्टरमध्ये ‘सिटी विथिन द सिटी’ या संकल्पनेतून विकास होणार आहे. येथे मोठे रस्ते, मुबलक पाणी, सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, गार्डन, मैदान, कम्युनिटी हॉल, जिम्नॅशियम, योगा सेंटर, डिजिटल लायब्ररी, डे-केअर सेंटर, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, महिला सक्षमीकरण केंद्र आणि स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग अशा २३ सुविधा दिल्या जाणार आहेत.
ठाण्यातील धोकादायक इमारतींच्या दुर्घटनांचा संदर्भ देत शिंदे म्हणाले की, हा प्रवास २० वर्षांच्या संघर्षातून पुढे आला आहे. किसननगरमधील पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे असून लवकरच रहिवाशांना घरांच्या चाव्या दिल्या जातील.
यावेळी त्यांनी ‘वॉक टू वर्क’ संकल्पनेवर भर देत स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा, सिद्धेश्वर तलावाचे सुशोभीकरण व्हावे आणि विकासकांनी नफ्याचा विचार न करता घरांच्या दर्जात तडजोड करू नये, अशा सूचना केल्या. रहिवाशांच्या कॉर्पस फंड आणि अतिरिक्त १०० चौ. फूट जागेच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
मुंबई-एमएमआरमध्ये पुढील १५-२० वर्षांत ३० लाख घरांची गरज असून मुंबई, मीरा-भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरमध्ये क्लस्टरला चालना दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. मेट्रो, कोस्टल रोड आणि ठाणे-बोरिवली बोगद्यामुळे ठाण्याच्या पायाभूत सुविधांना नवी दिशा मिळणार आहे.
या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार निरंजन डावखरे, आमदार रवींद्र फाटक, महापौर, उपमहापौर, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















