Home मुंबई *राज्यात चार अपर जिल्हाधिकाऱ्यांसह ४७नवीन अप्पर तहसीलदार कार्यालयांची निर्मिती* *•महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे...

*राज्यात चार अपर जिल्हाधिकाऱ्यांसह ४७नवीन अप्पर तहसीलदार कार्यालयांची निर्मिती* *•महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय*

71
0

*राज्यात चार अपर जिल्हाधिकाऱ्यांसह ४७नवीन अप्पर तहसीलदार कार्यालयांची निर्मिती*
*•महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय*

मुंबई, दि. २३ : सर्वसामान्य व ग्रामीण जनतेला शासकीय सुविधा सहज मिळाव्यात. महसुली सेवांचा लाभ जलद गतीने व्हावा. तसेच प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व्हावे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात ४७ नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्यात येत आहेत. तसेच ४ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयेही स्थापन केली जाणार आहेत.

शासकीय कार्यालयांमधील कामकाजाचा वाढता व्याप, उपलब्ध अपुरा अधिकारी व कर्मचारीवृंद, तालुक्यांचे व जिल्ह्यांचे भौगोलिक अंतर, वाढती लोकसंख्या आणि वेगाने होणारे नागरीकरण विचारात घेऊन प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, नवीन कार्यालयांमुळे तहसील व जिल्हा प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध महसुली सेवा नागरिकांना त्यांच्या अगदी जवळ व सुलभपणे उपलब्ध होतील.

* चार जिल्ह्यांमध्ये नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये*
प्रशासकीय विकेंद्रीकरणाला गती देण्यासाठी राज्यातील चार प्रमुख जिल्ह्यांमध्ये चार नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नागपूर जिल्ह्यातील नागपूर (ग्रामीण) येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे.

*राज्यातील २१ जिल्ह्यात ४७ नवीन अपर तहसीलदार कार्यालय*
* गडचिरोली : कुरखेडा, आरमोरी, धानोरा, सिरोंचा, एटापल्ली व अहेरी तालुक्यातील अनुक्रमे मालेवाडा, वैरागड, पेंढरी, आसरअल्ली, कसनसूर व जिमलगट्टा.
* भंडारा : पवनी तालुक्यातील अड्याळ.
* वर्धा : हिंगणघाट व सेलू तालुक्यातील अनुक्रमे अल्लीपूर व सिंदी (रेल्वे).
* नागपूर : नागपूर (ग्रामीण), हिंगणा, नागपूर (शहर), कामठी, काटोल, नरखेड, मौदा व कुही तालुक्यातील अनुक्रमे बुटीबोरी, हुडकेश्वर, वानाडोंगरी, पारडी, वडोदा, कोंढाळी, जलालखेडा, कोदामेंढी व वेलतूर.
* वाशिम : कारंजा तालुक्यातील कामरगाव.
* बुलढाणा : सिंदखेड राजा व खामगाव तालुक्यातील अनुक्रमे साखरखेर्डा व लाखनवाडा.
* यवतमाळ : पुसद व उमरखेड तालुक्यातील अनुक्रमे शेंबाळ पिंप्री व ढाणकी.
* नांदेड : हदगाव, मुखेड व किनवट तालुक्यातील अनुक्रमे तामसा, मुक्रमाबाद व इस्लापूर.
* लातूर : लातूर तालुक्यातील मुरुड बुद्रुक.
* परभणी : जिंतूर तालुक्यातील चारठाणा.
* जालना : जालना तालुक्यातील नेर.
* बीड : बीड व आष्टी तालुक्यातील अनुक्रमे नेकनूर व कडा.
* छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा.
* अहिल्यानगर : अकोले व नेवासा तालुक्यातील अनुक्रमे राजूर व घोडेगाव.
* नंदूरबार : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी.
* नाशिक : बागलाण तालुक्यातील नामपूर.
* कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील मजरे कार्वे.
* सातारा : फलटण व कऱ्हाड तालुक्यातील अनुक्रमे साखरवाडी व उंब्रज.
* पुणे : खेड तालुक्यातील चाकण.
* पालघर : डहाणू, वसई व पालघर तालुक्यातील अनुक्रमे कासा, विरार व बोईसर.
* मुंबई उपनगर जिल्हा : कुर्ला, बोरीवली व अंधेरी तालुक्यातील अनुक्रमे चेंबूर, मालाड व वांद्रे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या निर्णयामुळे विशेषतः गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागासह राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य जनतेला विविध दाखले, जमिनीचे फेरफार, संजय गांधी निराधार योजना व इतर शासकीय सेवा घरपोच व वेळेत मिळण्यास या निर्णयामुळे मोठा हातभार लागणार आहे.

“राज्यातील तळागाळातील, ग्रामीण व दुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिकांना महसुली सेवांचा लाभ अत्यंत सुलभ आणि गतिमान पद्धतीने मिळावा, यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. प्रशासन खऱ्या अर्थाने लोकाभिमुख करण्यासाठीच आपण राज्यात ४७ नवीन अपर तहसीलदार कार्यालये आणि ४ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
*• चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री, महाराष्ट्र*
——

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here