Home Trending Now *९ वर्ष, ५ कोटींची सुपारी, ८ गोळ्या… तरीही ‘आका’ मोकळाच!* *२००...

*९ वर्ष, ५ कोटींची सुपारी, ८ गोळ्या… तरीही ‘आका’ मोकळाच!* *२०० कोटींसाठी आर्किटेक्टचा बळी, Eknath Nimgade हत्याकांडात कोर्टाने CBI चा रिपोर्ट भिरकावला, १५०० पानांची चार्जशीट

104
0

*९ वर्ष, ५ कोटींची सुपारी, ८ गोळ्या… तरीही ‘आका’ मोकळाच!*

*२०० कोटींसाठी आर्किटेक्टचा बळी, Eknath Nimgade हत्याकांडात कोर्टाने CBI चा रिपोर्ट भिरकावला, १५०० पानांची चार्जशीट*

*नागपूर:* शहरातील ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांच्या निर्घृण हत्येला नऊ वर्षे पूर्ण होत आली आहेत, तरीही या प्रकरणाला अद्याप पूर्ण न्याय मिळालेला नाही. २०० कोटी रुपयांच्या जमिनीच्या वादातून आणि ५ कोटी रुपयांच्या सुपारीतून झालेल्या या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपासाच्या कार्यपद्धतीवर आणि भूमिकेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

*काय आहे संपूर्ण प्रकरण?*
६ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी भरवस्तीत एकनाथ निमगडे यांच्यावर आठ गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी पाच गोळ्या त्यांच्या शरीरात घुसल्या आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. हा केवळ खून नव्हता, तर २०० कोटी रुपयांच्या मौल्यवान जमिनीच्या वादातून ५ कोटी रुपयांची सुपारी देऊन केलेली एक सुनियोजित हत्या होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास तहसील पोलीस आणि गुन्हे शाखेकडे होता.

*पोलीस विरुद्ध सीबीआय – तपासात मोठी तफावत*
या प्रकरणात स्थानिक पोलीस आणि केंद्रीय यंत्रणेच्या दाव्यांमध्ये मोठी तफावत दिसून आली आहे. २०२१ मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गुन्हा पूर्णपणे उघडकीस आणल्याचा दावा केला होता. त्यांनी १५ गुंडांचा सहभाग असल्याचे आणि मारेकऱ्यांना १.२५ कोटी रुपयांचा ॲडव्हान्स दिल्याचे सांगितले होते.
मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तपास सीबीआयकडे गेल्यानंतर चित्र पालटले. सीबीआयने तब्बल आठ वर्षे तपास करूनही कोणाविरुद्धही भक्कम पुरावे सापडले नाहीत, असे सांगत नोव्हेंबर २०२४ मध्ये न्यायालयात क्लोजर रिपोर्ट अर्थात ‘ए समरी’ रिपोर्ट दाखल करून केस बंद करण्याची परवानगी मागितली.

*न्यायालयाने फेटाळला सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट*
सीबीआयच्या या भूमिकेवर नागपूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने नोव्हेंबर २०२५ मध्ये कठोर भूमिका घेतली. न्यायालयाने सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट पूर्णपणे फेटाळून लावला आणि आरोपींविरुद्ध खटला चालवण्याइतपत पुरेसे पुरावे असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने कुख्यात गँगस्टर रणजीत सफेलकर आणि शार्पशूटर मोहसीन अन्सारी ऊर्फ राजा पॉप यांच्याविरुद्ध थेट फौजदारी कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले आणि सफेलकरला १५०० पानांचे दोषारोपपत्र सोपवण्यात आले.

*कुटुंबीयांचा लढा सुरूच*
तपासातील त्रुटींमुळे व्यथित होऊन, एकनाथ निमगडे यांचे सुपुत्र ॲड. अनुपम निमगडे यांनी जुलै २०२६ मध्ये पुन्हा नागपूर सत्र न्यायालयात धाव घेतली. त्यांनी सीबीआयचा तपास मूलभूतपणे सदोष, अपूर्ण आणि मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालणारा असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सत्र न्यायालयाने या याचिकेची गंभीर दखल घेत सीबीआय आणि मुख्य आरोपींना नोटिसा बजावून उत्तर मागितले आहे.

मुख्य कट रचणारे, पैशांची रसद पुरवणारे आणि शस्त्रे पुरवणारे पडद्यामागील बडे चेहरे अजूनही पूर्णपणे तपासाच्या कचाट्यात का आले नाहीत? एका व्यक्तीसाठी चार्जशीट का थांबवली आहे? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.

आज जेव्हा काही हाय-प्रोफाईल प्रकरणांमध्ये काही दिवसांत सीबीआय चौकशी लागते आणि रोज रात्री स्टुडिओत चर्चा होते, तेव्हा नागपूरच्या या गंभीर प्रकरणात इतकी संथ गती का? हा प्रश्न सामान्य नागरिक आणि कायदेतज्ज्ञांना पडला आहे.

*कोण आहे सूत्रधार? गृहखाते हतबल आहे का? – MAI MEDIA 24 चा सवाल*

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here