*खान्देशी संमेलनासाठी दरवर्षी १५ लाख; बोलीभाषा संवर्धनाला मिळाला शासनाचा भक्कम आधार*
आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उद्याची सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे येथे मराठी भाषा विभागाची आढावा बैठक पार पडली.
मराठी ही आपली मातृभाषा आहे. तिच्यासोबत महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या प्रत्येक बोलीभाषेतील शब्द, साहित्य, संस्कृती आणि अस्मिता जपली पाहिजे. बोलीभाषा केवळ टिकून उपयोग नाही; त्या जगल्या आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. धुळ्यात संपन्न झालेल्या मराठी भाषा विभागाच्या आढावा बैठकीत साहित्यिकांशी संवाद साधताना मराठी आणि बोलीभाषांच्या संवर्धनासाठी शासनाकडून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिली.
धुळ्यात प्रा. पुरुषोत्तम पाटील यांच्या नावाने ‘कवितांचं गाव’ उभारण्यात येणार असून, मराठी भाषा विभागाकडून सुमारे १० हजार पुस्तके उपलब्ध करून दिली जातील. तसेच राज्यातील सर्व ३६ जिल्हाधिकारी कार्यालयांत स्वतंत्र ‘मराठी भाषा विभाग’ सुरू करण्याचे नियोजन आहे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.
यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार मंजुळा गावित, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राघवेंद्र भदाणे, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह ज्येष्ठ, युवा आणि महिला साहित्यिक उपस्थित होते.





















