*उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचा आढावा*
पुणे, दि. ३ सप्टेंबर – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पुणे जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांसह विविध विभागांच्या इमारतींच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अनिल पवार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणारे हे सर्व प्रकल्प महत्त्वाचे आहेत. यातील अनेक प्रकल्प हे आदरणीय दादांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहेत. त्यामुळे या प्रकल्पांची कामे वेळेत, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्या.
या प्रकल्पांना आपण स्वतः भेट देऊन पाहणी करणार असून, सर्व प्रकल्पांच्या कामांचा नियमितपणे आढावा घेतला जाईल, असेही सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितले.
बैठकीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भारतकुमार बाविस्कर, कार्यकारी अभियंता अमोल पवार, कार्यकारी अभियंता उज्ज्वला घावटे, प्रशांत खैरमोडे, उपअभियंता अनिल बडे, शाखा अभियंता अनिल काकडे, नवनाथ शेळके आदी उपस्थित होते.





















