९ व्या ब्रह्मपुत्रा व्हॅली फिल्म फेस्टिव्हलसाठी भारतातून चित्रपटांना आमंत्रित करणार
मुंबई, : ईशान्य भारतातील सर्वात प्रसिद्ध चित्रपट सोहळा असलेला ब्रह्मपुत्रा व्हॅली फिल्म फेस्टिव्हल यंदा तो नवव्यांदा बीव्हीएफएफ गुवाहाटी येथेच होणार आहे. अत्यंत उत्सुकता असलेल्या या चित्रपट महोत्सवासाठी, उलटगणीचा भाग म्हणून, संपूर्ण देशभरातून स्पर्धात्मक तसेच गैर- स्पर्धात्मक दोन्ही वर्गांसाठी प्रवेशिका आमंत्रित करण्यात आल्या आहेत. नवव्या ब्रह्मपुत्रा व्हॅली फिल्म फेस्टिव्हलसाठी (बीव्हीएफएफ) चित्रकर्त्यांनी आपल्या प्रवेशिका पाठविण्यासाठी ३० सप्टेंबर
२०२४ ही अंतिम मुदत आहे.
तत्त्व क्रिएशन्स आणि ब्रह्मपुत्रा फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा बीव्हीएफएफ हा सिनेप्रेमींसाठी एक महत्त्वाचे स्थान म्हणून समोर आला आहे. यात सांगितलेल्या न गेलेल्या कथा आणि उत्कृष्टता यांचा मिलाफ होऊन सर्व उपस्थितांना एक समृद्ध करणारा अनुभव मिळतो. सर्जनात्मकता आणि अर्थपूर्ण सिनेमाचा संगम घडवून आणणाऱ्या बीव्हीएफएफने या प्रदेशातील सांस्कृति परिदृश्य समृद्ध केले आहे. तसेच त्याच्या प्रत्येक आवृत्तीत सरासरी २५,००० जणांची उपस्थिती नोंदवली गेली आहे.
आधीच्या आवृत्तीत बीव्हीएफएफ आणि लोकप्रिय ओटीटी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईम यांचा सहयोग घडून आला होता. त्यामुळे होतकरू आणि स्वतंत्र चित्रकर्त्यांना आपल्या कल्पना, कार्य आणि प्रतिभा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याची मोठी संधी मिळाली होती. त्यामुळे या प्रतिभावंतांना अनेक संभाव्य संधी मिळाल्या होत्या.
ब्रह्मपुत्रा व्हॅली फिल्म फेस्टिव्हलच्या संचालिका तनुश्री हजारिका म्हणाल्या, “आम्ही नववी आवृत्ती घेऊन परत आलो आहोत आणि ती अधिक गतिशील व मोठी होण्याची शक्यता आहे. कोविडनंतर पहिल्यांदाच झालेल्या आठव्या आवृत्तीत बीव्हीएफएफ समुदायाकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे, अर्थपूर्ण सिनेमा तयार करणाऱ्या भारतातील श्रेष्ठ कथा सादरकर्त्यांना एक मंच उपलब्ध करून देण्याच्या आमच्या स्वप्नावरील आमचा विश्वास दृढ झाला आहे. बीव्हीएफएफ हा चित्रपट महोत्सवापेक्षा आणखी बरेच काही आहे. तो संपूर्ण ईशान्य भारतातील संस्कृती, सर्जनशीलता आणि प्रतिभा सादर करण्याचा मंच आहे. तसेच माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तींना तो एकत्र आणून त्यांच्या कथा, अनुभव आणि ज्ञान मांडण्याची संधी देतो.”




















