Home मुंबई *गणपती उत्सवाच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द*

*गणपती उत्सवाच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द*

30
0

*गणपती उत्सवाच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द*

*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटी महामंडळाचा निर्णय*

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई, दि. २१ ऑगस्ट : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी एसटीच्या एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारे ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले, “गणपती उत्सव, मुंबई-ठाण्यातील कोकणवासी आणि एसटी यांचे अतूट नाते आहे. मुंबई, ठाणे येथील आपल्या घरापासून कोकणातील वाड्या-वस्त्यांपर्यंत एसटी बसद्वारे थेट जाता येत असल्याने कोकणवासी नेहमीच एसटीला प्राधान्य देत आले आहेत. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात सरासरी ५ हजार बसेस आरक्षित केल्या जातात.”
यंदा एसटी महामंडळाचा वाढता तोटा कमी करण्यासाठी नाईलाजास्तव एकेरी गट आरक्षणावर ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयामुळे अनेक कोकणवासीय तसेच गणेशभक्त मंडळांनी प्रत्यक्ष भेटी घेऊन आणि निवेदनांद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हे अतिरिक्त शुल्क रद्द करण्याची मागणी केली होती.
कोकणवासीयांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे अतिरिक्त शुल्क रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिले. त्यानुसार कोकणवासीयांच्या भावनांचा आदर करून यंदा एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द करण्यात येत आहे. याबाबतचे परिपत्रक लवकरच एसटी प्रशासनाकडून जारी करण्यात येईल, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

*वाढत्या तोट्यामुळे नाईलाजास्तव ३० टक्के अतिरिक्त शुल्क*

दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून सुमारे ५ हजारांहून अधिक बसेस एसटी महामंडळाकडून उपलब्ध करून दिल्या जातात. या विशेष वाहतुकीसाठी राज्यातील इतर विभागांतून दोन-तीन दिवस आधी बसेस मागविल्या जातात.
एकेरी गट आरक्षणामुळे कोकणात प्रवाशांना सोडल्यानंतर या बसेस रिकाम्या परत आणाव्या लागतात. त्यामुळे एसटी महामंडळावर इंधनाचा खर्च तसेच चालक-वाहकांच्या अतिकालीन भत्त्याचा अतिरिक्त भार पडतो. त्यातच डिझेलच्या किमती आणि कर्मचाऱ्यांच्या अतिकालीन भत्त्यात वाढ झाल्याने एसटीच्या तोट्यात मोठी वाढ होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून एसटी महामंडळाने यंदापासून एकेरी गट आरक्षणावर ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. *तथापि, एका कुटुंबात ३०% अतिरिक्त शुल्क हे पुर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांला लागू होते. अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत आणि ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना १५% भार सहन करावा लागला असता. सध्या खासगी वाहतूकदारांनी वाढलेली तिकीट दर वाढ लक्षात घेता ही अतिरिक्त शुल्क वाढ किफायतशीर होती.*

मात्र, कोकणवासीयांच्या भावना आणि मागणी लक्षात घेऊन हे शुल्क आता रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला होणारा संभाव्य आर्थिक तोटा इतर मार्गांवरील प्रवासी वाहतूक वाढवून भरून काढावा, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here