Home मुंबई बेस्टच्या ताफ्यात १५० दुमजली वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या; प्रवाशांना मिळणार अधिक आरामदायी प्रवासाची...

बेस्टच्या ताफ्यात १५० दुमजली वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या; प्रवाशांना मिळणार अधिक आरामदायी प्रवासाची सुविधा

26
0

बेस्टच्या ताफ्यात १५० दुमजली वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या; प्रवाशांना मिळणार अधिक आरामदायी प्रवासाची सुविधा
मुंबई : मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने बेस्ट उपक्रमाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बेस्ट समितीच्या बैठकीत सर्वानुमते १५० दुमजली वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्यांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पर्यावरणपूरक बससेवेला आणखी बळ मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला. ११ ऑगस्ट २०२६ रोजी बेस्ट उपक्रमाच्या अध्यक्षा तृष्णा चंद्रकांत विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी यांच्या उपस्थितीत झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत १५० दुमजली वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्यांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
या इलेक्ट्रिक दुमजली बसगाड्या पर्यावरणपूरक असून त्यांच्यामुळे ध्वनी किंवा वायुप्रदूषण होत नाही. वातानुकूलित बसगाड्यांमध्ये दोन्ही बाजूंनी स्वयंचलित प्रवेशद्वार असल्याने प्रवाशांना चढ-उतारासाठी अधिक सुविधा मिळणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बसमध्ये सीसीटीव्ही यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी मोबाईल चार्जिंगची सुविधाही करण्यात आली आहे.
याशिवाय, या बसगाड्यांपैकी काही बसगाड्या ‘ओपन डेक’ स्वरूपात उपलब्ध करून देण्याची सूचनाही बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी केली आहे. आगामी काळात आणखी नवीन एकमजली तसेच दुमजली वातानुकूलित बसगाड्यांचा बेस्टच्या ताफ्यात समावेश करण्यात येणार आहे.
मुंबईतील प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने बसगाड्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला असून, विविध बसपुरवठा व्यावसायिक संस्थांना कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना अधिक आधुनिक, आरामदायी आणि पर्यावरणपूरक बससेवा उपलब्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here