Home मुंबई *स्वातंत्र्यदिनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा अनोखा पुढाकार*

*स्वातंत्र्यदिनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा अनोखा पुढाकार*

27
0

*महापौर बंगल्याचे आवार स्थानिक नागरिकांच्या प्रभातफेरी (मॉर्निंग वॉक) साठी खुले*

मुंबईच्या महापौरांचे शासकीय निवासस्थान असलेला, भायखळा स्थित महापौर बंगल्याचा निसर्गरम्य परिसर आता स्थानिक नागरिकांच्या प्रभातफेरीसाठी अर्थात ‘मॉर्निंग वॉक’ साठी खुला करण्यात आला आहे.

भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आज (दिनांक १५ ऑगस्ट २०२६) सकाळी महापौर निवासस्थानी ध्वजारोहण केल्यानंतर स्वतः या निवासस्थानाचे मुख्य प्रवेशद्वार खुले करून परिसरातील रहिवासी नागरिकांना ही विशेष आणि अनोखी भेट दिली.

मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना, शांत, मोकळ्या आणि निसर्गरम्य वातावरणात प्रभातफेरीसाठी हक्काची जागा मिळावी, या उद्देशाने महापौर रितू तावडे यांनी हा निर्णय घेतला आहे.

स्थानिक नागरिकांना बंगल्यालगतच्या पदपथावरून आणि तेथून थेट निवासस्थानाच्या विस्तीर्ण आवारात दररोज सकाळी ६ ते ९ या वेळेत नियमित मॉर्निंग वॉक करता येईल.

मुंबईच्या महापौरांचे सध्याचे निवासस्थान हे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय परिसरात स्थित आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये महापौर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर, जून २०२६ च्या अखेरीस महापौर रितू तावडे यांनी या शासकीय निवासस्थानात वास्तव्यास प्रारंभ केला.

महापौर बंगल्याच्या परिसरातील स्थानिक नागरिकांशी महापौर नियमित संवाद साधत असतात. पुरातन वारसा अर्थात हेरिटेज श्रेणीत असलेल्या या बंगल्याचा परिसर वृक्षांनी वेढलेला आहे. भल्या सकाळी निसर्गाच्या सान्निध्यात फिरणे नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असते. हे लक्षात घेऊन आणि स्वातंत्र्यदिनी महापौर रितू तावडे यांनी स्वतः घेतलेल्या या जनहिताच्या निर्णयामुळे स्थानिक रहिवासी आणि ज्येष्ठ नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, महापौरांच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here