*भायखळ्यातील नूतनीकृत लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे शुक्रवार, दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण*
*दक्षिण मुंबईला मिळणार ७६१ आसनक्षमतेसह अत्याधुनिक यंत्रणेसह सुसज्ज व वातानुकूलित नाट्यगृह*
*अत्याधुनिक ‘सरांऊडींग’ ध्वनीक्षेपक यंत्रणेसह विविध कार्यक्रमांसाठी उपयुक्त अत्याधुनिक प्रकाशयोजना व्यवस्था*
दक्षिण मुंबईतील भायखळा पूर्व रेल्वे स्थानकापासून जवळ असणाऱ्या नूतनीकृत लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण शुक्रवार दि. ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून उप मुख्यमंत्री तथा पालकमंत्री (मुंबई शहर जिल्हा) एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री एडव्होकेट आशिष शेलार तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत.
मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमहापौर संजय घाडी यांच्या विशेष उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक खासदार अरविंद सावंत, विशेष अतिथी म्हणून आमदार अमित साटम, स्थानिक आमदार मनोज जामसुतकर, आमदार सुनिल शिंदे व राजहंस सिंह उपस्थित राहतील.
सभागृह नेता गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, विविध पक्षांचे गटनेते, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, स्थानिक नगरसेवक यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची दिनांक १ ऑगस्ट रोजी जयंती आहे. त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या या लोकार्पण सोहळ्यामुळे मुंबईला सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि आधुनिक सुविधा असलेले नाट्यगृह उपलब्ध होणार असून, कला, साहित्य आणि सांस्कृतिक चळवळींना नवे व्यासपीठ मिळणार आहे.
…
*साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृतिदालन*
👇
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे स्मृतिदालन या नाट्यगृहाच्या तळमजल्यावर उभारण्यात आले आहे. याठिकाणी लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा आहे. तसेच स्मृतीदालनात अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, सुभाषिते, लावणी, गाणी, शाहिरी प्रदर्शित करण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या छायाचित्रासह सामाजिक संदेशही प्रदर्शित करण्यात आले आहेत.
…
*असे आहे नाट्यगृह*
👇
भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे खुल्या नाट्यगृहाचा पुनर्विकास करून सन २०२१ मध्ये बंदिस्त नाट्यगृह बांधण्यात आले आहे. अत्याधुनिक प्रकाशयोजना, अत्याधुनिक ध्वनीक्षेपण यंत्रणेसह ७६१ आसनक्षमतेचे सुसज्ज वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृह उभारण्यात आले आहे. नूतनीकृत नाट्यगृहातील रंगमंचाची रुंदी २१ मीटर आहे आणि लांबी ११ मीटर इतकी आहे. नाट्यगृहात क्रायरूम (लहान बाळांसाठीची खोली), ग्रीन रुम्स, दोन मेकअप रुम्स यांची सुविधा उपलब्ध आहे.
नाट्यगृहामध्ये विद्युत पुरवठा काही कारणास्तव खंडित झाल्यास विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी डिझेलवर चालणाऱ्या विद्युत जनित्राची सुविधा आहे. संकुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे.
…
*सुसज्ज वाहनतळ*
👇
नाट्यगृहाच्या तळघरात सुमारे ३२ वाहने उभी करण्याची क्षमता असलेली सशुल्क यांत्रिकी वाहनतळाची सुविधा उपलब्ध आहे. पहिल्या मजल्यावर प्रेक्षकांसाठी उपाहारगृहाची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या नाट्यगृहाच्या पहिल्या मजल्यावर प्रशस्त मोकळी जागा आहे. तसेच नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी महानगरपालिकेचे स्वतंत्र कार्यालय आहे.
===

















