*महाअभियानाची “Asia Book of Records” तसेच “India Book of Records” मध्ये विक्रमी नोंद*
*एकाच दिवसात २९८ ठिकाणी सुमारे २७ हजार ८६६ महिलांची स्तन कर्करोग तपासणी*
*महिलांनी नियमितपणे आरोग्य तपासणी करावी – महापौर रितू तावडे यांचे आवाहन*
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, ’बहीण लाडकी मुख्यमंत्र्यांची, घेऊ काळजी तिच्या आरोग्याची!’ या ध्येयाने आयोजित या महाअभियानाचे आयोजन आज (दिनांक २२ जुलै २०२६) संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आले होते. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे आयोजित स्तनाचा कर्करोग तपासणी महाअभियानामध्ये मुंबई महानगरातील ३० वर्षांहून अधिक वयोमान असलेल्या महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २९८ ठिकाणी मिळून २७ हजार ८६६ महिलांनी स्तन कर्करोग तपासणी महाअभियानात आज (दिनांक २२ जुलै २०२६) विक्रमी सहभाग घेतला. या विक्रमानिमित्त Asia Book of Records” तसेच “India Book of Records” तर्फे महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या या सन्मान सोहळ्यास यावेळी आमदार अमित साटम, सभागृह नेते गणेश खणकर, शिवसेना गटनेते अमेय घोले, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि सुधार समिती अध्यक्षा संध्या दोशी सक्रे, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे, बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षा हेतल गाला, नगरसेवक तेजिंदर तिवाना, नगरसेवक भास्कर शेट्टी, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा लवंगारे, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
स्तन कर्करोग पूर्व तपासणीमुळे रूग्णांचे निदान लवकर होण्यासाठी मदत होईल. तसेच वेळीच उपचार घेणेही शक्य होणार आहे. ज्या महिलांना कर्करोगाचे निदान होईल, अशा महिलांना पुढील उपचारासाठी महानगरपालिका रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायम महिलांच्या आरोग्यासाठी प्राधान्य दिले आहे. महिला सहभागातून आरोग्य हिताच्या व्यापक अभियानात झालेल्या एका विक्रमाची नोंदीचा आनंद आणि अभिमान असल्याचे प्रतिपादन महापौर रितू तावडे यांनी केले.
महापौर श रितू तावडे यांनी आज (दिनांक २२ जुलै २०२६) रोजी रोटरी क्लब, आर. एन. गांधी शाळेसमोर, घाटकोपर (पूर्व), शिवाजी सभागृह , कामा लेन याठिकाणी आरोग्य शिबिरांना भेट दिली. यावेळी नगरसेवक धर्मेंद्र गिरी उपस्थित होते. ३० वयोगटातील महिलांनी नियमितपणे आरोग्य तपासणी करावी. स्तन कर्करोगाची लक्षणे दिसताच तातडीने उपचार घ्यावेत. पहिल्या टप्प्यात निदान होऊन औषधोपचार घेतल्यास रूग्ण बरे होण्याची शक्यता अधिक असते, असे महापौर यांनी यावेळी नमूद केले.
एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात शिबिरांचे आयोजन करण्यामध्ये लोकप्रतिनिधी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी आणि आरोग्य यंत्रणेचा मोठा वाटा आहे. एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध करून दिल्यानेच ही विक्रमी संख्या गाठणे शक्य झाल्याचे सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे म्हणाले.
स्तन कर्करोग तपासणी शिबिराच्या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रातील आरोग्य परिचारिका व आरोग्य सेविका /आशा सेविका आणि इतर निम वैद्यकीय कर्मचारी यांनी योगदान दिले. तसेच सर्व प्रभागांमध्ये शिबिरांच्या आयोजनाकरिता महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स, महानगरपालिकेच्या सर्वसाधारण रुग्णालयातील डॉक्टर्स तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्याकडून प्राप्त झालेले डॉक्टर्स व स्थानिक वैद्यकीय असोसिएशन आणि विविध संस्थांशी संलग्न अशा डॉक्टरांची शिबिराला उपस्थिती होती.
शिबिरांच्या माध्यमातून रक्तदाब, वजन आदीची तपासणी करण्यात आली. त्यासोबतच महिलांच्या स्तन कर्करोग तपासणीची प्राथमिक चाचणी करण्यात आली. ज्या महिलांना मॅमोग्राफी चाचणीची गरज आहे, अशा महिलांना पुढील चाचणीसाठी महानगरपालिका रूग्णालयात संदर्भित करण्यात आले.
लोकमान्य टिळक सर्वसाधारण रूग्णालय (शीव), राजे एडवर्ड स्मारक रूग्णालय (केईएम), बा.य.ल. नायर रूग्णालय, टाटा कर्करोग रूग्णालय या रूग्णालयांसह अहिल्याबाई होळकर कॅन्सर रुग्णालय (भायखळा), महालक्ष्मी येथील सीपीए कॅन्सर पेशंट एड असोसिएशन (CPAA) येथे मॅमोग्राफी चाचणीची सुविधा उपलब्ध आहे.
***


















