Home Uncategorized *मुंबई लोकल प्रवास रामभरोसे, प्रवाशांवर हल्ले, खून, मारामाऱ्या, महिला अत्याचारांत वाढ पण...

*मुंबई लोकल प्रवास रामभरोसे, प्रवाशांवर हल्ले, खून, मारामाऱ्या, महिला अत्याचारांत वाढ पण सरकार व रेल्वे प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत. – खा. वर्षा गायकवाड.*

24
0

मुंबई, दि. १६ जुलै ..

मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवास हा दिवसेंदिवस धोकादायक व चिंताजनक बनला आहे. लोकलमध्ये चाकू हल्ला, खून, मारमारी, महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झालेली दिसत आहे. लोकल प्रवास सुरक्षित राहिलेला नाही. आधीच लोकलमधील गर्दीमुळे लोंबकळत प्रवास कारावा लागत असताना आता वाढलेल्या हिंसक घटनामुळे लोकल प्रवास रामभरोसे झाला आहे. रेल्वे पोलीस, रेल्वे व्यवस्थापन व राज्य सरकार कोणालाही प्रवाशांची काळजी नसून सरकार कुंभकर्णी झोपेत आहे, असे गंभीर आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

यासंदर्भात सरकारवर तोफ डागत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबई शहर व मुंबईतील लोकल प्रवास हा सुरक्षित मानला जात होता पण मागील काही दिवसातील घटना पाहता लोकल प्रवास सुरक्षित राहिलेला नाही. मागील महिन्यात लोकलमध्ये एका तरुण मुलावर चाकू हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. तर दुसऱ्या घटनेत लोकल स्टेशनच्या समोर किरकोळ कारणावरून चाकू हल्ला करण्यात आला. या घटना ताज्या असतानाच आता १६ जुलैच्या मध्यरात्री मध्य रेल्वेच्या अंबरनाथ लोकलमध्ये एका प्रवाशावर हल्ला करण्यात आला. एका तरुण प्रवाशाची हत्या झाल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचललेली नाहीत. लोकलमध्ये प्रवासी धारधार शस्त्र घेऊन मोकाट फिरत आहेत. महिलांचा प्रवासही सुरक्षित राहिलेला नाही. एखादी घटना घडल्यानंतर तपास व चौकशीचा देखावा केला जातो आणि पुन्हा ‘पहिले पाढे पंच्चावन्न’, अशी परिस्थिती असते.

मुंबईतील लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांशी अनेकवेळा बैठका घेण्यात आल्या पण हे अधिकारी लोकप्रतिनिधींनाही जुमानत नाहीत. संसदेतही मुंबई लोकलच्या सुविधांवर आम्ही सातत्याने प्रश्न उपस्थित केले पण कधीही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. मुंबईत दररोज लाखो लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करतात पण सरकार व रेल्वे प्रशासन आपल्याच मस्तीत आहे, त्यांना मुंबईकरांच्या सुरक्षेशी काहीही देणेघेणे नाही. मुंबई लोकल प्रश्नी आम्ही पुन्हा संसदेत जाब विचारू, असे खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here