Home मुंबई *महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली जेजुरी अपघातग्रस्तांची भेट*

*महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली जेजुरी अपघातग्रस्तांची भेट*

28
0

*• अल्पवयीन व वृद्ध चालकांवर कारवाईचे पोलिसांना निर्देश*

मुंबई, दि. १३ : जेजुरी येथील अपघातग्रस्त वारकऱ्यांची रुग्णालयात जाऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर,”वारीत अपघाताच्या घटना होऊ नयेत यासाठी अल्पवयीन व वृद्ध चालकांवर कारवाईचे पोलिसांना निर्देश दिल्याचे ते म्हणाले.
आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत तीन वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची भेट घेऊन अपघाताची संपूर्ण माहिती घेतली. बावनकुळे म्हणाले, ६५ वर्षीय चालकाने सर्दी-खोकल्याचे औषध घेतले होते. औषधामुळे सुस्ती आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन चुकीच्या दिशेने घुसल्याने हा अपघात झाला. या अपघातातील तीन जखमींवर जेजुरी येथील आनंदी हॉस्पिटलमध्ये डॉ. काकडे यांच्या निगराणीखाली उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर आहे. तर, एका गंभीर जखमी वारकऱ्याला पुढील उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हे वारकरी प्रामुख्याने सांगली, नांदेड आणि इतर भागांतील आहेत.

*वाहतूक सुरक्षेबाबत पोलिसांना कडक सूचना*
भविष्यात वारीत असे अपघात टाळण्यासाठी पोलीस महासंचालक सदानंद दाते व पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल यांनी स्वतः लक्ष घातले आहे. वायरलेसवरून सर्व प्रशासनाला कडक सूचना देण्यात आल्या आहेत. वारीमध्ये अल्पवयीन तरुण किंवा ६० वर्षांवरील वृद्ध चालकांना वाहने चालवण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच वाहनांचे फिटनेस, ब्रेक आणि ओव्हरस्पीडिंग तपासण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासन आता अधिक सतर्क झाले आहे.
——

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here