*सचिन अहिर यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना आ. प्रवीण दरेकरांचे प्रतिपादन*
मुंबई- विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी आज शिवसेनेचे सचिन अहिर यांची एकमताने निवड झाली. सचिन अहिर यांची कारकिर्द विद्यार्थी चळवळ ते महाविद्यालयीन निवडणुकीपासून सुरू झाली. आज आपला मित्र विधिमंडळाच्या सर्वोच्च सभागृहाच्या उपसभापती पदी विराजमान होत असल्याचा आनंद होत असल्याचे प्रतिपादन भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी अभिनंदन प्रस्तावावर बोलताना केले.
आ. दरेकर म्हणाले की, असे एकही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रात सचिन अहिर यांचा वावर नाही. त्यांची विधिमंडळाची कारकीर्द संस्मरणीय आहे. विधानसभा आणि विधान परिषद सभागृहातही त्यांनी काम केले आहे. म्हाडाचे अध्यक्ष, गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द संपूर्ण महाराष्ट्राने व विधिमंडळाने पाहिली आहे. सचिन तेंडुलकरसारखा एक अष्टपैलू नेता, कार्यकर्ता सचिन अहिर यांच्या माध्यमातून आपण पाहिला आहे. कामगार क्षेत्रासह सहकार, क्रीडा क्षेत्रातही सचिन अहिर यांचा ठसा आहे. सर्व क्षेत्रात त्यांचा वावर व मित्रत्वाचे संबंध आहेत. योग्य वेळी, योग्य निर्णय सचिन अहिर यांनी घेतला आहे. त्यांना सत्ताधारी व विरोधी पक्षाचा अनुभव आहे. त्यांनी त्या जबाबदाऱ्या लिलया पार पाडल्या आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती पदावर अनेक मोठे नेते आपली कारकीर्द गाजवून गेले. प्रत्येकाने आपला इतिहास निर्माण केलाय. नीलम गोऱ्हे यांनी अतिशय संवेदनशील भूमिका महिलांसाठी मांडली, सामाजिक प्रश्न हाताळले. तशीच भूमिका सचिन अहिर निभावतील, अशा शब्दांत आ. दरेकर यांनी सचिन अहिर यांना त्यांच्या कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
00000


















