Home मुंबई *स्वयंपुनर्विकास आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरविण्यासाठी उद्योग विभाग किंवा एमआयडीसीने*

*स्वयंपुनर्विकास आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरविण्यासाठी उद्योग विभाग किंवा एमआयडीसीने*

40
0

*ड्राफ्ट सीडीसीपीआरमध्ये बदल करण्याची आ. प्रवीण दरेकरांची लक्षवेधीद्वारे मागणी*

मुंबई – स्वयंपुनर्विकास आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरविण्यासाठी उद्योग विभाग किंवा एमआयडीसीने ड्राफ्ट सीडीसीपीआरमध्ये आवश्यक ते बदल एका महिन्याच्या आत करणार का? अशी मागणी भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आज लक्षवेधीद्वारे केली. त्याला उद्योग मंत्र्यांनीही सकारात्मक उत्तर दिले.

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानपरिषदेच्या सभागृहात आ. प्रवीण दरेकर यांनी एमआयडीसीतील गृहनिमाण संस्थांच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी ड्राफ्ट सीडीसीपीआरमध्ये बदल करण्याबाबत लक्षवेधी मांडली. लक्षवेधीवर बोलताना आ. दरेकर म्हणाले कि, शासनाकडून निर्णय घेतला जातो परंतु अंमलबजावणी होत नाही. ५ जुलै २०२३ रोजी एमआयडीसीने सीडीपीआर संदर्भात अधिसूचना काढली. औद्योगिक वसाहतीतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला दिशा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला. मात्र ३ वर्ष झाली अजून अंमलबजावणी झालेली नाही. एमआयडीसी क्षेत्रातील सोसायट्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून मंत्रालयापर्यंत सर्वांकडे पत्रव्यवहार केला. मात्र त्यांना थातूरमातुर उत्तरं देण्यात आली. राज्यात स्वयं पुनर्विकासाला मोठा प्रतिसाद मिळतोय. एमआयडीसी क्षेत्रातील सोसायट्यांनाही स्वयं पुनर्विकास करायचा आहे. त्याचे प्रस्तावही एमआयडीसीकडे सादर केलेत. परंतु शासन निर्णय काढलेला असतानाही परवानगी दिली जात नाही. मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण धोरण जाहीर केले. त्यात स्वयं पुनर्विकासाला प्रोत्साहन दिलेय. खासगी, शासकीय जमिनीवरील स्वयं पुनर्विकासाला परवानगी आणि एमआयडीसी जमिनीवरील स्वयं पुनर्विकासाला नकार असे शासनाला करता येणार नाही. त्यामुळे स्वयं पुनर्विकास आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य ठरण्यासाठी उद्योग विभाग किंवा एमआयडीसी ड्राफ्ट सीडीपीआरमध्ये आवश्यक ते बदल महिन्याच्या आत करेल का? एमआयडीसी क्षेत्रातील सोसायट्यांना पुनर्विकासासाठी जे प्रस्ताव आलेत त्यांनाही महिन्याभरात परवानगी देणार का? अशी विनंती वजा मागणी आ. दरेकरांनी केली.

दरेकरांच्या लक्षवेधीवर बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले कि, सीडीपीआरमध्ये अगोदरच बदल केला आहे. तो बदल केल्यामुळे दरेकरांनी केलेल्या मागण्या पूर्ण होणार आहेत. तसेच एफएसआय वाढवून सदनिकांची संख्या वाढवणे ही मागणी देखील पूर्ण होणार असल्याचे सकारात्मक उत्तर मंत्री सामंत यांनी दिले.

लक्षवेधीच्या या चर्चेत आ. प्रसाद लाड, सचिन अहिर, अमित गोरखे यांनीही सहभाग घेतला होता.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here