*महापौरांनी प्रत्यक्ष भेट पाहणी केल्यानंतर स्केट पार्कमध्ये स्वच्छता*
*स्केट पार्क मध्ये आवश्यक डागडुजी आणि वृक्षारोपण करण्याचे महापौरांनी दिले निर्देश*
समाज माध्यम अर्थात सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून नागरी समस्या सोडवण्याचे एक प्रभावी माध्यम बनू शकते, याचा प्रत्यय काल (दिनांक ६ जून २०२६) सायंकाळी मुंबईत आला.
दादर (पूर्व) परिसरात गोल्ड सिनेमाजवळ हिंदमाता उड्डाणपुलाखाली असलेल्या स्केट पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर धूळ आणि कचरा साचल्याची तसेच पार्कची दुर्दशा झाल्याची बाब हर्ष चौबे या सजग तरुणाने थेट इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून निदर्शनास आणून दिली. अतिशय वेगाने व्हायरल झालेल्या या पोस्टची दखल घेऊन मुंबईच्या महापौर श्रीमती रितूू तावडे यांनी तत्काळ स्केट पार्कला भेट दिली आणि तातडीने स्वच्छता करवून घेतली. तिथे वृक्षारोपण देखील केले. या पार्कची डागडुजी करण्यासह विविध निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना महापौरांनी दिले आहेत.
दादर परिसरातील रहिवासी असलेला तरुण हर्ष चौबे याने हिंदमाता उड्डाण पुलाखालील स्केट पार्कच्या अवस्थेची चित्रफीत आणि माहिती इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. या पार्कमध्ये साचलेला कचरा आणि धूळ लहान मुलांच्या आरोग्यासाठी आणि खेळाडूंसाठी हानिकारक ठरू शकतो, याकडे त्याने लक्ष वेधले होते. ही पोस्ट इंस्टाग्रामवर व्हायरल झाली. ही पोस्ट मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी स्वतः पाहिली आणि काही वेळातच त्या थेट स्केट पार्कमध्ये दाखल झाल्या.
हिंदमाता उड्डाणपुलाखालील स्केट पार्क येथे भेटीसाठी येत असताना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना देखील बोलावले. अधिकाऱ्यांसोबत संपूर्ण स्केट पार्क मध्ये फिरून परिस्थितीची महापौरांनी प्रत्यक्ष पाहणी केली. क्रीडांगणाची झालेली दुरवस्था पाहून महापौरांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी तत्काळ स्वच्छता करण्याचे सक्त निर्देश महापौर श्रीमती तावडे यांनी दिले.
महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या या सक्त भूमिकेनंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर मोहीम हाती घेऊन अवघ्या काही वेळातच हा संपूर्ण स्केट पार्क झाडून, कचरा हटवून आणि पाण्याने धुवून काढत पूर्ववत स्वच्छ, सुंदर केला. या ठिकाणी सखोल स्वच्छता करावी आणि त्यात सातत्य राखावे. पार्कमध्ये आवश्यक ती डागडुजी आणि रंगरंगोटी करावी. पावसाच्या पाण्यापासून पार्कचे संरक्षण करण्यासाठी कार्यवाही करावी, सुरक्षारक्षक नेमावा, पुरेशी विद्युत प्रकाश व्यवस्था ठेवावी, असे विविध निर्देशही महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले.
महापौर श्रीमती रितू तावडे या स्वतः स्केट पार्कमध्ये आल्याचे कळताच हर्ष चौबे हा तरुणही तेथे दाखल झाला. सजग नागरिक आणि समाज माध्यमाचा सकारात्मक वापर करणारे तरुण हीच आपल्या मुंबईची खरी ताकद आहे. यापुढेही नागरिकांनी आणि तरुणांनी केलेल्या सूचना आणि तक्रारींची दखल घेतली जाईल, त्यांचे तत्काळ निराकरण केले जाईल, असे आश्वासन देऊन महापौरांनी हर्षने दाखवलेल्या सजगतेबद्दल आभार मानले. महानगरपालिकेने उभारलेल्या प्रकल्पांना, उपक्रमांना सुस्थितीत ठेवण्यासाठी नागरिकांनी देखील हातभार लावावा, असे आवाहनही महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केले.
दरम्यान, स्केट पार्क अधिक सुशोभित करण्यासाठी महापौर श्रीमती रितू तावडे आणि हर्ष यांच्या हस्ते पार्कमध्ये विशेष रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये हिरवळ अधिक उठावदार बनवणारे आकर्षक ‘झेब्रा प्लांट’ आणि पांढऱ्या, सुगंधी फुलांनी परिसराला प्रसन्नता देणारी तसेच कमी देखभालीत वाढणारी ‘स्पायडर लिली’ ही शोभिवंत रोपे लावण्यात आली.
इन्स्टाग्रामवरील एका सजग तक्रारीमुळे आणि महापौरांच्या तत्पर कारभारामुळे आता हे स्केट पार्क लहान मुलांसाठी आणि स्केटिंग करणाऱ्या तरुण वर्गासाठी पुन्हा एकदा सुरक्षित आणि सज्ज झाले आहे.
*स्केट पार्क संदर्भात अतिरिक्त माहिती*
हिंदमाता उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभीकरण करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेच्या एफ दक्षिण विभागाने दिनांक ५ डिसेंबर २०२२ ते ४ मार्च २०२३ या कालावधीत १८७ चौरस मीटर क्षेत्रफळात हे स्केट पार्क विकसित केले. या ठिकाणी स्केटिंगसोबतच मल्लखांब शिल्प, बेल लेअर हे संगीतमय वाद्य, गेम एक्स आणि ओ, बेबल ड्रम आणि लहान मुलांसाठी सापशिडी यांसारख्या विविध खेळांची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे.
***





















