Home मुंबई *मुंबईतील प्रत्येक क्षेपणभूमी परिसरात वृक्ष लागवड केली जाणार; नागरिकांनी अभियानात सहभागी व्हावे...

*मुंबईतील प्रत्येक क्षेपणभूमी परिसरात वृक्ष लागवड केली जाणार; नागरिकांनी अभियानात सहभागी व्हावे – महापौर रितू तावडे*

56
0

*जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कांजूरमार्ग क्षेपणभूमी येथे १६ हजार वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभ*

*चिमुकल्यांसह मुंबईकर नागरिकांचा वृक्ष लागवडीमध्ये उत्स्फूर्त सहभाग, शुभारंभप्रसंगी सुमारे ७५० वृक्षांची लागवड*

मुंबईत हरित क्षेत्र आणि नागरी वन निर्मितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. ‘रिरुट (ReRoot)’ हा नागरी वन पुनर्स्थापना उपक्रमसुद्धा याच प्रयत्नांचा भाग आहे. तथापि, मुंबईत हरितक्षेत्र वृद्धिंगत करण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनी देखील पुढाकार घ्यायला हवा. प्रत्येकाने किमान एकतरी झाड लावावे, असे आवाहन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केले आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका आणि अँटोनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रिरुट (ReRoot)’ या नागरी वन पुनर्स्थापना उपक्रमाचा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या शुभहस्ते कांजूरमार्ग क्षेपणभूमी येथील कचरा प्रक्रिया केंद्र येथे दि ५ जून २०२६ शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी तावडे बोलत होत्या.

स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, एस आणि टी विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्ष श्रीमती साक्षी दळवी यांनी देखील या उपक्रमात सहभाग नोंदवला. उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन)किरण दिघावकर यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच, शालेय विद्यार्थी, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक आदी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले. बहावा आणि इतर स्थानिक वृक्षप्रजातींची शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लागवड करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांसह नागरिकही या उपक्रमात मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. या माध्यमातून शुभारंभप्रसंगी सुमारे ७५० झाडे लावण्यात आली.

घनकचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधांचे हरित आणि शाश्वत परिसंस्थेमध्ये रूपांतर करण्याच्या उद्देशाने ‘रिरुट’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत, कांजूरमार्ग क्षेपणभूमी परिसरात सुमारे १६ हजार नवीन वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये सातपेक्षा अधिक स्थानिक व पर्यावरणास अनुकूल वृक्षप्रजातींचा समावेश आहे. याठिकाणी आधीपासून सुमारे १२,८०० वनस्पती अस्तित्वात असून या उपक्रमामुळे मुंबईच्या हरित क्षेत्रात मोठी भर पडणार आहे.

मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यावेळी म्हणाल्या की, मुंबईतील वाढते नागरीकरण, लोकसंख्येची घनता आणि इतर अन्य बाबी लक्षात घेऊन येथे हरित क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जात आहे. मोठ्या प्रमाणात सुरू असलेली विकासकामे, पायाभूत सुविधांची निर्मिती आदींमुळे काही ठिकाणी वृक्ष कपात करावी लागली. मात्र, विकासकामेही तितकीच महत्वाची असतात. तथापि, या विकासकामांमुळे झालेली नैसर्गिक हानी भरून काढण्यासाठी अन्यत्र वन आणि हरित क्षेत्र निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतला जातो. एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावली जातात. ‘रिरुट (ReRoot)’ हा नागरी वन पुनर्स्थापना उपक्रमसुद्धा अशाच प्रयत्नांपैकी एक आहे. कांजूरमार्ग क्षेपणभूमीप्रमाणेच इतरही क्षेपणभूमीच्या ठिकाणी तसेच गृहसंस्थांच्या परिसरात अशाप्रकारे वृक्ष लागवड करून वनक्षेत्र निर्मिती केली जाईल. तथापि, नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन मुंबईला अधिक हरित आणि पर्यावरणस्नेही बनवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन तावडे यांनी यावेळी केले.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here