Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर *अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात भीम आर्मीची ठाम भूमिका; आंबेडकरी नेत्यांच्या एकत्रीकरणाचे...

*अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात भीम आर्मीची ठाम भूमिका; आंबेडकरी नेत्यांच्या एकत्रीकरणाचे आवाहन*

17
0

सोलापूर (प्रतिनिधी)– अनुसूचित जाती (एससी) आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या प्रस्तावित धोरणाच्या विरोधात भीम आर्मी महाराष्ट्रने ठाम भूमिका घेतली असून, समाजात फूट पाडणारे आणि संविधानातील समान हक्कांच्या तत्त्वाला बाधा आणणारे कोणतेही उपवर्गीकरण मान्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून ही भूमिका मांडली.
निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जाती समाजाच्या आरक्षण हक्कांमध्ये उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न हा सामाजिक एकात्मतेला धक्का देणारा असून, त्यामुळे समाजामध्ये विभागणी निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय राज्यघटनेने सर्व घटकांना समान संधी व समान हक्क प्रदान केले आहेत. त्यामुळे आरक्षणातील उपवर्गीकरण हे संविधानाच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगत असल्याचे भीम आर्मीचे मत आहे.
यावेळी आंबेडकरी चळवळीतील सर्व नेते, सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी वैचारिक मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज असल्याचेही नमूद करण्यात आले. समाजाच्या व्यापक हितासाठी आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी सर्व आंबेडकरी नेतृत्वाने संयुक्त भूमिका घेणे आवश्यक असल्याचे भीम आर्मीने म्हटले आहे.
तसेच, बीड येथून निघणाऱ्या उपवर्गीकरण विरोधी लॉंग मार्चच्या पार्श्वभूमीवर समाजातील सर्व प्रमुख नेत्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले. जर समाजातील नेते या संघर्षात सहभागी झाले नाहीत आणि समाजासोबत उभे राहिले नाहीत, तर त्यांच्या भूमिकेबाबत समाजात नाराजी निर्माण होईल व असे नेतृत्व समाजाला अमान्य ठरू शकते, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
भीम आर्मीने मात्र संघर्षापेक्षा एकतेला प्राधान्य दिले असून, सर्व नेत्यांनी व्यक्तिगत अहंकार व मतभेद बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी एकत्र यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. हा ऐतिहासिक लॉंग मार्च सामाजिक न्याय, संविधानिक हक्क आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल, असेही सांगण्यात आले.
याशिवाय महाराष्ट्र शासनाला देखील स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण लागू करण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास राज्यभर लोकशाही मार्गाने व्यापक आणि तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा निर्धार भीम आर्मीने व्यक्त केला आहे.
यावेळी कार्यकर्त्यांनी “उपवर्गीकरण रद्द झालेच पाहिजे”, “संविधान बचाव – आरक्षण बचाव” आणि “लढेंगे – जितेंगे” अशा घोषणा देत आपल्या भावना व्यक्त केल्या.

भीम आर्मी महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांनी समाजातील सर्व घटकांना एकजूट राखण्याचे आवाहन करत आरक्षण आणि संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here