अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम (पॉलिटेक्निक) प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया २१ मेपासून सुरू झाली आहे.
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया दहा एप्रिलपासून सुरू आहे. मराठवाड्यात दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या अडीच लाखांवर आहे तर अकरावी, पॉलिटेक्निक, आयटीआय अभ्यासक्रमांची एकूण प्रवेश क्षमता साडेपाच लाखांवर आहे. त्यात दहावीची गुणपत्रिका अद्याप मिळाली नसल्याने गुणपत्रिका कधी मिळणार, दाखला कधी तयार होणार, असा प्रश्न विद्यार्थी, पालकांना सतावतो आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल आठ मे रोजी ऑनलाइन जाहीर केला. दहावी निकालानंतर विद्यार्थी, पालकांची पुढील प्रवेशासाठीची लगबग सुरू झाली. विद्यार्थी, पालकांचे अकरावी, आयटीआयसह पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेकडे लक्ष लागले. अकरावी ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया निकालापुर्वीच सुरू झाली. यासह अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच वास्तुकला पदविका अभ्यासक्रमांच्या २०२६-२७ शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया २० मेपासून सुरू झाली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. २० मे ते २२ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी, कागदपत्र पडताळणी, अर्ज निश्चितीची प्रक्रिया करता येणार आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी २४ जून रोजी जाहीर होणार आहे. मराठवाड्यात आठ पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता सतरा हजारपेक्षा अधिक आहे. आयटीआय २४ हजार तर अकरावीची तीन लाखांपेक्षा अधिक प्रवेश क्षमता आहे. प्रवेश प्रक्रियेसह विद्यार्थी, पालकांचे गुणपत्रिका कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
*’सविस्तर वेळापत्रक’नंतर..!*
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ यांच्याद्वारे १० वीची गुणपत्रिका संबंधीत शाळांमार्फत वितरीत करण्यात आल्यावर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक प्रवेश वेबवाईटवर जाहीर करण्यात येणार असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
*विद्यार्थी, पालकांची होतेय गैरसोय…!*
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा २ मे रोजी तर दहावीचा ८ मे रोजी निकाल जाहिर केला. बारावीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे झाले. अद्याप विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. प्रवेश नोंदणीसाठी गुणपत्रिकेची छायांकित प्रत गृहित धरली जात असली तरी विद्यार्थी-पालकांना मात्र आता पुढील प्रवेशासाठी दाखला, गुणपत्रिकेसह इतर आवश्यक कागदपत्रांकरिता चकरा माराव्या लागत आहेत. निकालानंतर पुढील प्रवेशासाठीच्या प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थी, पालकांची धावपळ सुरू आहे. प्रवेशासाठीची विविध कागदपत्रे, प्रमाणपत्रांची आवश्यकता आहे. आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करणे महत्त्वाचे असते.
यंदा मंडळ गुणपत्रिका, प्रमाणपत्र एकाच वेळी देणार असल्याचे जाहिर केले. त्यामुळे निकालानंतर किमान आठ दिवसात गुणपत्रिका मिळेल अशी अपेक्षा होती. पंधरा दिवसानंतरही अद्याप मंडळाकडून कोणत्याही सूचना नाहीत. यामुळे अडचणी येत असल्याचे विद्यार्थी, पालकांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर विभागात बारावीची (नियमित) परीक्षा उत्तीर्ण केलेले विद्यार्थी १ लाख ६२ हजार २२ आहेत. दहावीत १ लाख ६३ हजार ५२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लातूर विभागात बारावीचे ७५ हजार ६४१ विद्यार्थी तर दहावीत ९४ हजार ३५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.



















