Home मुंबई *“मिशन वेस्ट टू वेल्थ” अभियान महापारेषणकडून राज्यभर राबविणार*

*“मिशन वेस्ट टू वेल्थ” अभियान महापारेषणकडून राज्यभर राबविणार*

25
0

*अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सुचिता भिकाने यांचा पुढाकार*
——————-
मुंबई, दि. २१ : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) आणि वेसॅक इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जून २०२६ ते ६ जून २०२७ या कालावधीत संपुर्ण महाराष्ट्रभर “मिशन वेस्ट टू वेल्थ” हा विशेष पर्यावरण जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहे. अपर जिल्हाधिकारी तथा महापारेषणच्या कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सुचिता भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली `वेस्ट टू वेल्थ कल्चर विकसित करून पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्त परिसर, पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती याबाबत व्यापक जनजागृती करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

महापारेषणच्या सर्व परिमंडळ, मंडल, विभाग व उपविभाग स्तरावर वर्षभर विविध पर्यावरणपूरक उपक्रम, स्वच्छता मोहीम आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये सिंगल यूज प्लास्टिकमुक्त कार्यालय, जुन्या कपड्यांचा पुनर्वापर, ई-वेस्ट संकलन, जुने कागद व डायऱ्यांचे संकलन तसेच पर्यावरण संवर्धनासाठी सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत संकलित करण्यात येणाऱ्या जुन्या डायऱ्या, कपडे व इतर उपयुक्त साहित्य गरजू विद्यार्थ्यांसाठी आणि सामाजिक संस्थांसाठी वापरण्यात येणार असल्याचे महापारेषणने स्पष्ट केले आहे. तसेच कार्यालय परिसर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी विशेष स्वच्छता व जनजागृती अभियानही राबविण्यात येणार आहे.

बांद्रा-कुर्ला संकुलातील ‘प्रकाशगंगा’ इमारतीत आयोजिलेल्या पर्यावरण संरक्षण विषयक सेमिनारमध्ये मांडण्यात आलेल्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात येत असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सुचिता भिकाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here