बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी एस विभागातील विक्रोळी (पूर्व) स्थित कन्नमवार नगर स्वच्छता कामगारांच्या चौकीस बुधवारी सकाळी आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. चौकीवरील स्वच्छता कर्मचाऱ्यांसमवेत त्यांनी संवाद साधला.
मुंबईतील रस्ते आणि त्याभोवतीचा परिसर, चौक स्वच्छतेकडे व्यापक लक्ष देऊन परिसर स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य द्यावे. कचरा साचणाऱ्या ठिकाणाचे समूळ उच्चाटन करावे. त्यासाठी जनजागृती करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.
उपलब्ध असलेली आधुनिक यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळाचा योग्य वापर करा, अशा सूचनादेखील भिडे यांनी दिल्या.
उप आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, उप आयुक्त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे, सहायक आयुक्त समरीन सय्यद आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.


















