*मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे निर्देश*
मुंबई,
आरे वसाहती मधील विविध प्राधिकरणाकडे असलेल्या ६५एकर जागेवर येत्या पावसाळ्यात झाडे लावण्याचे नियोजन करा, तसेच आरे जंगलाची घनता वाढविण्यासाठीच्या उपाययोजनां बाबत ही कृती आराखडा तयार करा असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांनी आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्या प्रमाणे
राज्य शासनाकडून ३०० कोटी वृक्षलागवड मोहिम हाती घेण्यात येणार आहे. मुंबईचे वाढते तापमान लक्षात घेता,
या योजनेत मुंबई उपनगराचा सहभाग वाढवण्यासाठी आज
आरे वसाहतीचा मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांनी पाहणी दौरा केला. या वसाहती मध्ये जी शासकीय प्राधिकरणे व कार्यालये आहेत, त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचे कामकाज समजून घेतले, त्यांना जिल्हा नियोजनातून काही मदत करता येईल का?
तसेच त्यांच्याकडे असलेल्या जागांपैकी मोकळी जागा आहे का? असल्यास किती वृक्ष लागवड करता येईल? याबाबत प्रत्येक शासकीय कार्यालयात जाऊन हा आढावा घेण्यात आला. या दौऱ्यात मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी, मुंबई महापालिका, एमएमआरडीए अशा संबंधित अधिकाऱ्यांना नोंदी करायला सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी या जागेवर वृक्ष किती लागू शकतात, कोणते लावणे अपेक्षित आहे तसेच काही ठिकाणी मियावाकी जंगल वाढवता येईल का? आरे मधील जंगलाची घनता वाढविण्यासाठी काय करता येईल ? याचे संपूर्ण नियोजन व कृती आराखडा सादर करा असे निर्देश मंत्री शेलार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
या दौऱ्यात गोरेगाव पशुवैद्यकीय रुग्णालय, महानंद डेरीचे मुख्यालय, आरे वसाहतीमधील
राज्य राखीव पोलीस बल,गट क्र 8 आणि फोर्स 1 कार्यालय,कृषी उद्योग विकास महामंडळाच्या कार्यालयात,पशुसंवर्धन गुणनियंत्रण प्रयोगशाळा, केंद्रीय कुक्कुटपालन व विकास संघटन, माँडर्न बेकरी कँम्पससह परिसराची त्यांनी आज पाहणी केली. प्रथमदर्शनी पाहणीमध्ये या कार्यांकडे असलेल्या जागांपैकी सुमारे ६५ एकर जागा वृक्षारोपणासाठी उपलब्ध होईल असा अशी माहिती समोर आली आहे. अजूनही सविस्तर अभ्यास करुन जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा असे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले.
तसेच मेट्रो भवनसाठी जी जागा प्रस्तावित करण्यात आली होती ती रिक्त असून त्या जागेवर वृक्षारोपण करता येईल का? तसेच आरे मेट्रो कारशेड मध्ये जी जागा रिक्त आहे त्यावर वृक्षारोपण करण्यात आले आहे त्याची घनता वाढविण्यासाठी काय करावे याबाबत ही कृती आराखडा तयार. करण्याचे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले.
















