Home मुंबई *नियमित स्वच्छतेसोबत बांधकाम व पाडकाम राडारोड्याचे संकलन योग्यप्रकारे करावे, त्यासाठी विभागस्तरावर आराखडा...

*नियमित स्वच्छतेसोबत बांधकाम व पाडकाम राडारोड्याचे संकलन योग्यप्रकारे करावे, त्यासाठी विभागस्तरावर आराखडा तयार करावा*

16
0

*• स्वच्छ सर्वेक्षण-२०२६ आणि ‘मुंबई क्लीन लीग’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिक दर्जेदार पद्धतीने कार्यवाही करावी*

*• अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांचे स्पष्ट निर्देश*

मुंबई महानगर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी संपूर्ण मुंबईत अत्यंत गांभीर्याने आणि जबाबदारीने स्वच्छताविषयक कार्यवाही होणे गरजेचे आहे. सर्वत्र स्वच्छता दृश्यमान स्वरूपात प्रतिबिंबित व्हायला हवी. या अनुषंगाने, नियमित स्वच्छतेसोबत बांधकाम व पाडकाम राडारोडा (सी अँड डी वेस्ट) संकलन योग्यप्रकारे करावे. यासाठी प्रत्येक विभागस्तरावर बांधकाम व पाडकाम राडारोडा व्यवस्थापन आराखडा तयार करावा. स्वच्छ सर्वेक्षण-२०२६ आणि ‘मुंबई क्लीन लीग’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिक दर्जेदार पद्धतीने कार्यवाही करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी दिले आहेत.

पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील स्वच्छताविषयक कामकाजासंदर्भात ‘एम पश्चिम’ आणि ‘एच पश्चिम‘ विभाग कार्यालयात आज (दि. ३० एप्रिल २०२६) आढावा बैठक पार पडली. यावेळी जोशी बोलत होत्या.

उपायुक्त (परिमंडळ-४) भाग्यश्री कापसे, उपायुक्त (परिमंडळ-३) विश्वास मोटे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, उपायुक्त (परिमंडळ-६) संतोषकुमार धोंडे, उपायुक्त (परिमंडळ-५) संध्या नांदेडकर, उपायुक्त (परिमंडळ-७) मनीष वळंजू, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील विविध प्रशासकीय (वॉर्ड) विभागांचे सहायक आयुक्त आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी, पश्चिम उपनगरातील विविध प्रशासकीय विभागांतील स्वच्छताविषयक सद्यस्थिती तसेच बांधकाम व पाडकाम राडारोडा (सी अँड डी वेस्ट), कचरा संकलन आणि अनुशेष, विशेष काळजीयोग्य कचरा, यांत्रिक पद्धतीने केली जाणारी स्वच्छता, कचरा संकलन वाहने आणि मनुष्यबळाची सद्यस्थिती आदी बाबींचा सविस्तर आढावा संगणकीय सादरीकरणाद्वारे घेण्यात आला.

दरम्यान, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या की, नियमित स्वच्छतेसोबत बांधकाम व पाडकाम राडारोडा (सी अँड डी वेस्ट) संकलन योग्यप्रकारे करावे. यासाठी प्रत्येक प्रशासकीय विभाग स्तरावर बांधकाम व पाडकाम राडारोडा व्यवस्थापन आराखडा तयार करावा. त्यामध्ये, बांधकाम व पाडकाम राडारोडा टाकली जाणारी अनधिकृत ठिकाणे, त्यावर टाकल्या जाणाऱ्या राडारोड्याचे प्रमाण आणि त्याची सद्यस्थिती याची इत्यंभूत माहिती समाविष्ट करावी.

तसेच, सकाळच्या सत्रात स्वच्छता करण्यासाठी पूर्णतः घनकचरा व्यवस्थापन विभाग अंतर्गत कार्यरत महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पूर्ण क्षमतेने वापर करावा. नंतरच्या सत्रासाठी रस्ते स्वच्छता योजना किंवा पिंक आर्मीचा वापर करावा. तथापि, स्वच्छता राखली जात असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी पर्यवेक्षण देखील तितक्याच जबाबदारीने व्हायला हवे. यासाठी, घनकचरा व्यवस्थापन विभागातील सर्व कार्यकारी अभियंता यांनी नियमितपणे प्रत्यक्ष क्षेत्र भेटी द्याव्यात. यांत्रिकी पद्धतीने केली जाणारी स्वच्छता अधिक प्रभावीपणे करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. दीर्घकाळ रजेवर असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश देखील जोशी यांनी यावेळी दिले.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here