Home धुळे / नंदुरबार / जळगाव / अहिल्यानगर *“नदी म्हणजे नारीशक्ती… गोदा ते नर्मदा जलयात्रेतून उपमुख्यमंत्री शिंदेंच नवीन विकास मॉडेल!”*

*“नदी म्हणजे नारीशक्ती… गोदा ते नर्मदा जलयात्रेतून उपमुख्यमंत्री शिंदेंच नवीन विकास मॉडेल!”*

12
0

*“ इतिहास, अध्यात्म, विकास आणि नारीशक्तीचा हा महासंगम!”*

*जन्मभूमीतून कर्मभूमीकडे… अहिल्यादेवींच्या स्मरणार्थ ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेला प्रारंभ*

अहिल्यानगर

नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ती ऊर्जा, शक्ती, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे आणि म्हणूनच नदी म्हणजे नारीशक्ती! या विचाराला जलसंवर्धन, संस्कृती आणि विकासाची जोड देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ च्या शुभारंभातून एक नवीन विकास मॉडेल मांडल. श्रीक्षेत्र चौंडी हे मराठी संस्कृतीचे माहेरघर येथे झालेल्या या भव्य सोहळ्यात त्यांनी राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी कोटी कोटी नमन करत भाषणाची सुरुवात केली.

चौंडी (जन्मभूमी) ते महेश्वर (कर्मभूमी) हा प्रवास केवळ भौगोलिक नसून आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक सांगड घालणारा आहे. या यात्रेपूर्वी अहिल्यादेवी स्मारकाचे पूजन, जलकलश पूजन आणि जन्मभूमीच्या पवित्र मातीचा कलश पूजन करण्यात आले. “माती आणि पाणी हेच आपल्या जीवनाचे मूळ,” असे सांगत शिंदेंनी परंपरेचा गौरव केला.

आजच्या कार्यक्रमाप्रमाणे नाशिक त्रंबकेश्वर येथे देखील असा उपक्रम राबवला जात आहे. “जन्मभूमीतील पवित्र माती व जलकलश शिर्डीमार्गे मध्यप्रदेशातील महेश्वर येथे नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.” त्यामुळे या यात्रेला राज्याबरोबरच राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे.

“जल नसेल तर जग नाही,” असा स्पष्ट इशारा देत त्यांनी दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धनाचे महत्व सांगितले. समाज केवळ राजकारणावर नाही, तर धर्म आणि अध्यात्मावर चालतो, असे सांगत त्यांनी वारकरी संप्रदाय आणि संत परंपरेचे महत्त्वही अधोरेखित केले. ही जलयात्रा म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नसून जलसाक्षरता, जनजागृती आणि महिला सक्षमीकरणाचा व्यापक उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोदा ते नर्मदा ही केवळ यात्रा नाही, तर नारीशक्ती, जलसंवर्धन आणि विकासाचा नवा महामंत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करताना शिंदे म्हणाले की, “त्यांनी मंदिर, घाट, धर्मशाळा उभारून संस्कृती जपली; गंगा, नर्मदा आदी नद्यांच्या काठावर घाट बांधले, शेतकरी व व्यापाऱ्यांना सवलती देऊन अर्थव्यवस्था मजबूत केली; न्यायप्रिय, धर्मनिष्ठ आणि संवेदनशील प्रशासन दिले.

अंधश्रद्धा नाकारत ‘मानवता हाच खरा धर्म’ हा विचार त्यांनी रुजवला. महिलांना शिक्षण व स्वावलंबन देत नारीशक्तीला बळकटी दिली. अन्नछत्र, धर्मशाळा आणि सेवा कार्यातून त्यांनी लोककल्याणाचा आदर्श निर्माण केला. ‘लोकमाता’ म्हणून मिळालेला सन्मान हा त्यांच्या कार्याचा सर्वोच्च गौरव असल्याचे शिंदेंनी नमूद केले. यंदा त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त ३१ मे रोजी जयंती साजरी होणार असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

नदी ही स्त्रीशक्तीचे प्रतीक असल्याचे सांगत “जगातील जे काही मंगल आहे ते स्त्रीलिंगी आहे,” असे त्यांनी ठामपणे मांडले आणि नारीशक्ती, जलसंवर्धन आणि विकास यांचा थेट संबंध जोडला. राज्यातील विकासकामांवर बोलताना त्यांनी २२३ सिंचन प्रकल्पांना मंजुरी, ४.२५ लाख कोटींची गुंतवणूक आणि ३२ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा निर्णय यांचा उल्लेख केला. “सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘मराठवाडा वॉटर ग्रीड ‘ पुन्हा सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.

वारसा संवर्धनावर भर देताना “छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारसा यादीत जाणे हा अभिमानाचा क्षण आहे,” असे त्यांनी नमूद केले. महिलांसाठी राबवलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” कधीही बंद होणार नसल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी विविध योजना राबवल्या जात असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

या कार्यक्रमाचे आयोजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून झाले असून, विधान परिषदेचे सभापती रामभाऊ शिंदे, माजी खासदार सुजय विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार अमोल खताळ, आमदार काशिनाथ दाते, यांसह अध्यात्मिक क्षेत्रातील विभूती अन्य मान्यवर उपस्थित होते.

“ ‘अहमदनगर नाही, आता अहिल्यानगर,”असे ठामपणे सांगत शिंदेंनी अस्मितेचा सन्मान अधोरेखित केला. “जे बोलतो ते करून दाखवतो… आम्ही टीम म्हणून काम करतो,” असे म्हणत त्यांनी आपल्या नेतृत्वशैलीवर विश्वास व्यक्त केला.

समारोप करताना एकनाथ शिंदे म्हणाले, “महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे अहिल्यादेवी हिंदुत्वाचा हुंकार, लोकशाहीचा आविष्कार, त्याग आणि समर्पणाचे प्रतीक, म्हणजे अहिल्यादेवी असे सांगत त्यांनी सर्वांना या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here