Home मुंबई *मनपा आयुक्तांशी चर्चा करून लवकरच मुंबईतील मजूर सहकारी संस्थांना महापालिकेच्या सेवेत घेऊ*

*मनपा आयुक्तांशी चर्चा करून लवकरच मुंबईतील मजूर सहकारी संस्थांना महापालिकेच्या सेवेत घेऊ*

9
0

*प्रशिक्षण शिबिराच्या उद् घाटनवेळी महापौर रितू तावडेंची ग्वाही*

मुंबई – मजूर सहकारी संस्थांना मुंबई महापालिकेतील कामांमध्ये समाविष्ट करून घेऊन त्यांच्या हाताला मुंबई महापालिकेच्या निधीच्या माध्यमातून कसे काम मिळेल याचा जोरदार प्रयत्न प्रविण दरेकर करताहेत. ठाणे महापालिकेने जे परिपत्रक काढले ते घेऊन मी आजच आयुक्त अश्विनी भिडे यांच्याशी फोनवरुन चर्चा करेन आणि लवकरात लवकर मुंबईत कार्यरत असणाऱ्या सातशे-आठशे मजूर सहकारी संस्थांचा महापालिकेच्या सेवेत समावेश करून घेऊ.”अशी ग्वाही मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिली.

मुंबई कोकण विभागीय मजूर सहकारी संघाच्या वतीने आज दादर येथील कोहिनुर मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभासद संस्थांचे प्रशिक्षण शिबीर पार पडले. या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, शहाजी पाटील, प्रभाग समितीचे अध्यक्ष व नगरसेवक प्रकाश दरेकर, राज्य कंझ्युमर फेडरेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले, माजी आमदार रमेश कदम, मुंबई कोकण विभागीय मजूर सहकारी संघाचे अध्यक्ष व आयोजक सुनील बांबुळकर, दादा इंगळे, मुंबई बँकेचे संचालक विनोद बोरसे, आनंदराव गोळे, सुहास गमरे, लक्ष्मण आंगणे, नगरसेवक बाळा तावडे, माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांसह सर्व विभागीय संघाचे संचालक मंडळ, मुंबईच्या तिन्ही फेडरेशनचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मजूर संघातून आलेले प्रतिनिधी, उपप्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना महापौर रितू तावडे म्हणाल्या की, मजूर सहकारी संस्थांतील पदाधिकाऱ्यांना जसे ताकद देण्याचे काम प्रविण दरेकर करतात तसे आम्हाला बळ देण्याचे कामही तेच करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रविण दरेकर हे आमच्या पाठीशी कायम उभे राहतात. एक व्यक्ती सहकार चळवळीतून उभी राहिली आणि यातूनच तुमच्यासारखे कार्यकर्ते घडले हेच प्रविण दरेकर यांचे कार्य किती आहे याचे दर्शन घडवते. कोणतीही संस्था मजबूत व्हायची असेल तर तिच्या सदस्यांचे ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन सशक्त असणे हे फार गरजेचे असते. सहकारी संघाने नेहमीच कामगार आणि सभासदांच्या हितासाठी उल्लेखनीय काम केले आहे. सहकारी संस्थांमध्ये सर्वच मराठी माणसं आहेत. मुंबईने सर्वांनाच समाविष्ट करून घेतलेय तर आपला मराठी माणूस मुंबईत राहिला पाहिजे, त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे, याची तळमळ देवाभाऊ आणि प्रविण दरेकर यांना जी आहे ती आम्ही कायम पाहिली आहे. ठाणे महापालिकेने जे परिपत्रक काढले ते घेऊन मी आजच आयुक्तांशी फोन वरुन चर्चा करेन आणि लवकरात लवकर मुंबईत कार्यरत असणाऱ्या सातशे-आठशे सहकारी संस्थांना महापालिकेच्या सेवेत समाविष्ट करून घेऊ, अशी ग्वाहीही महापौर रितू तावडे यांनी दिली.

तर उपमहापौर संजय घाडी म्हणाले की, सहकाराने मला आणि प्रविण दरेकर यांना आज इथे उभे केले आहे. सहकाराशिवाय आमच्या दोघांच्याही आयुष्यात पर्याय नव्हता. मजूर सहकारी संस्थांमध्ये थोडासा वाईट काळ आला. शासनाचे वेगवेगळे निर्णय होत गेले, आपल्याला कामे मिळू शकली नाही. परंतु प्रविण दरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काळ बदलला, खूप मेहनत घेतली त्यामुळे चांगली कामे मजूर सहकारी संस्थांना मिळायला लागली. कोतवाल गावातून एक जिद्द घेऊन आलेला हा तरुण मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या पदावर जाण्याचे कारण म्हणजे मजूर सहकारी संस्था आणि सहकार आहे. या सहकाराची कास आम्ही पकडली नसती तर इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. ज्या प्रकारे मजूर सहकारी संस्थांना कामे मिळावी यासाठी ठाणे महानगरपालिकेने जीआर काढला तसा आयुक्तांशी चर्चा करून काढावा.”अशी मागणी उपमहापौर घाडी यांनी महापौर रितू तावडे यांच्याकडे केली.

तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार दरेकर म्हणाले की, “सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्याला किमतीवर ३३ टक्के काम करण्याचा निर्णय कालच घेतला आहे. आज महापौर रितू तावडे यांच्याकडून मजूर सहकारी संस्थांना अपेक्षा आहे. अनेक वर्ष मी पत्रव्यवहार केलाय, मागण्या करतोय. परंतु मुंबई महापालिका मोठ्या ठेकेदारांच्या दबावाखाली आजही आहे. मजूर सहकारी संस्थेत काम करणारी मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकं आहेत. त्यांना महानगरपालिकेची कामे मिळाली तर मुंबईच्या स्वच्छतेत आणि विकासातही फार मोठे काम उभे राहील. याबाबत आपल्याकडे बैठकही झाली. आयुक्तही होते. आपण त्या विषयाला सुरुवातही केलीय. परंतु तो विषय आपण मार्गी लावावा व मजूर सहकारी संस्थांना दिलासा द्यावा. नुकताच ठाणे महानगरपालिकेने तशा प्रकारचा निर्णय केला आहे. आपणही तशा प्रकारचा निर्णय घ्यावा.” अशी विनंतीही दरेकर यांनी महापौर रितू तावडे यांच्याकडे केली.

तसेच दरेकर पुढे म्हणाले की,” माझा उगम हा मजूर सहकारी चळवळीच्या माध्यमातून झाला. सहकार चळवळीच्या माध्यमातून ज्या ज्या संस्थेत मी जातो त्या संस्थेला ताकद आणि दिशा देण्याचे काम करतो. पालकत्वाच्या भूमिकेने मी या चळवळीला जपण्याचे आणि वाढवण्याचे काम करतोय. स्वयं पुनर्विकासाची योजना मुंबईत सुरू केली. पैसे आम्ही देतोय, परवानग्या सरकार देणार आहे. आज ३६० स्क्वेअर फुटातील माणूस १४०० स्क्वेअर फुटात राहण्यास गेलाय. ही किमया सहकाराची आहे. आपल्या संस्थेच्या माध्यमातून लोकांना कसा उपयोग होईल याचा सातत्याने मी प्रयत्न केला. काळानुसार मजूर सहकारी संस्थांनीही बदल करणे गरजेचे आहे .असे दरेकर म्हणाले.

*२७ एप्रिलला ‘सहकारी महाराष्ट्र’ मुखपत्राचे प्रकाशन*

दरेकर म्हणाले की, “सोमवार २७ एप्रिल २०२६ रोजी ‘सहकारी महाराष्ट्र’ या मुखपत्राचे मुंबई बँकेच्या सभागृहात राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. स्वतःचे मुखपत्र वाढवण्याचे काम आपण करूया. छोट्या सहकारी संस्थेवर अन्याय झाला तर त्याची खरी बाजू काय हे त्या अंकात आपण छापणार आहोत. ती जबाबदारी आपली आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.” असे आवाहनही दरेकरांनी यावेळी केले.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here