Home मुंबई *छायाचित्र स्पर्धेमुळे निसर्गाचे विविध पैलू कलात्मकदृष्ट्या टिपण्यास वाव*

*छायाचित्र स्पर्धेमुळे निसर्गाचे विविध पैलू कलात्मकदृष्ट्या टिपण्यास वाव*

16
0

*मुंबई मनपा शिक्षण विभागाच्यावतीने ‘माझी मुंबई’ या विषयावर आयोजित खुल्या छायाचित्र स्पर्धेच्या पारितोषिक वितरणात शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांचे मत*

*महानगरपालिका विद्यार्थी गटातून गणेश बाग इंग्रजी शाळेचा विद्यार्थी मोहम्मद नजीब महयुद्दिन याने पटकावला प्रथम क्रमांक*

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित छायाचित्र स्पर्धेच्या माध्यमातून महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना निसर्गाचे विविध पैलू कलात्मकदृष्ट्या टिपण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. आज या स्पर्धेतील विजेते तसेच सहभागी छायाचित्रकारांची छायाचित्रे पाहताना आणि विशेषत: शालेय विद्यार्थ्यांची छायाचित्रे पाहताना अतिशय आनंद वाटला. छायाचित्रण करताना त्यांच्यामध्ये तयार झालेला कलात्मक दृष्टिकोन अधिक भावला. त्यामुळे शिक्षण विभागाने आगामी काळात असा उपक्रम अधिक मोठ्या स्तरावर आयोजित करावा, अशी सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी केली.

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्यावतीने ‘माझी मुंबई’ या विषयावर आयोजित खुल्या छायाचित्र स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ करी रोड येथील त्रिवेणी संगम महानगरपालिका शाळा सभागृह येथे गुरुवार दि. ९ एप्रिल २०२६ रोजी पार पडला. यावेळी शिरवडकर बोलत होत्या.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किर्तीवर्धन किरतकुडवे, उपशिक्षणाधिकारी श्री. मुख्तार शाह, श्री. किसन केकरे, कला प्राचार्य श्री. दिनकर पवार, परिक्षक छायाचित्रकार श्री. मनोज मुसळे, शिक्षक आणि सहभागी विद्यार्थी, महानगरपालिका कर्मचारी आणि छायाचित्रकार या कार्यक्रमास उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रामुख्याने खुला गट, महानगरपालिका कर्मचारी गट आणि महानगरपालिका शालेय विद्यार्थी गटातील विजेते तसेच सहभागी छायाचित्रकारांच्या ठराविक छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

छायाचित्र स्पर्धेत महानगरपालिका विद्यार्थी गटामध्ये मोहम्मद नजीब महयुद्दिन, आकाश सहानी आणि आयेशा खान यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. तिन्ही विजेत्यांना अनुक्रमे २ हजार, २ हजार आणि दीड हजार रुपयांची रोख रक्कम व सन्मानचिन्ह बक्षीस स्वरुपात प्रदान करण्यात आले.

महानगरपालिका विद्यार्थी गटामध्ये मार्तंड पितळे, विष्णू सहानी, अल्फिया अन्सारी, अनिकेत वर्मा, सूरज मौर्या यांना उत्तेजनार्थ म्हणून एक हजार रुपयांची रोख रक्कम व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

महानगरपालिका कर्मचारी गटामध्ये अमोल पवार, प्रशांत कांबळे आणि शाहीन शेख यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. तिन्ही विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ४ हजार आणि ३ हजार रुपयांची रोख रक्कम व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

महानगरपालिका कर्मचारी गटामध्ये दिनेश रिकामे, संतोष यादव, उज्ज्वला जाधव यांना उत्तेजनार्थ विजेते म्हणून २ हजार रुपयांची रोख रक्कम व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

खुल्या गटामध्ये विजयकुमार गोहिल, संजय शुक्ला आणि मंथन तांबे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. तिन्ही विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ४ हजार आणि ३ हजार रुपयांची रोख रक्कम व सन्मानचिन्ह बक्षिस स्वरुपात प्रदान करण्यात आले. तर याच गटात सायली मडकईकर, दर्शन माळी, सचिन गोपाळ भरणकर यांना उत्तेजनार्थ विजेते म्हणून २ हजार रुपयांची रोख रक्कम व सन्मानचिन्ह बक्षिस स्वरुपात प्रदान करण्यात आले.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here