Home मुंबई *वसईत जखमी बालकाची रुग्णालयांत फरफट,हलगर्जीपणावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल*

*वसईत जखमी बालकाची रुग्णालयांत फरफट,हलगर्जीपणावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल*

17
0

*रुग्णालयांची माहिती देणारा ‘डॅशबोर्ड’ कार्यान्वित करण्याची शिफारस*

मुंबई
वसई येथे चार वर्षांच्या विघ्नेशवर झालेल्या अमानुष हल्ल्यानंतर, त्याला उपचारासाठी चार वेगवेगळ्या रुग्णालयांत फिरावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गंभीर प्रकरणाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने दखल घेतली असून, आरोग्य यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी आणि रुग्णांची होणारी फरफट थांबवण्यासाठी ‘डॅशबोर्ड’ तयार करण्याची शिफारस मीरा-भाईंदर-वसई-विरारचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना केली आहे.

लोकमत मुंबई संपादक अतुल कुलकर्णी यांनी या प्रकरणावर वृत्तांकन केल्यानंतर डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला. त्यांनी पोलीस अहवाल आणि पीडित कुटुंबाकडून सविस्तर माहिती घेतली. यासंदर्भात त्यांनी पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्याशी थेट संवाद साधून घटनेचे गांभीर्य अधोरेखित केले.

*डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या प्रमुख मागण्या आणि सूचना:*

मीरा-भाईंदर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने एकत्रितपणे एक ‘कॉमन डॅशबोर्ड’ तयार करावा. यावर परिसरातील कोणत्या रुग्णालयात कोणत्या स्वरूपाचे उपचार आणि खाटा उपलब्ध आहेत, याची अद्ययावत माहिती असावी. जेणेकरून आपत्कालीन स्थितीत रुग्णांना त्वरित उपचार मिळतील आणि त्यांची वणवण थांबेल.

या घटनेतील आरोपी संदीप पवार याच्याविरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याची प्रक्रिया समजून घेत, त्याला कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये, ही पीडित कुटुंबाची मागणी डॉ. गोऱ्हे यांनी पोलिसांपर्यंत पोहोचवली आहे.

विघ्नेशवर झालेला हल्ला अत्यंत क्रूर होता. अशा परिस्थितीतही त्याला चार रुग्णालये बदलावी लागली, हे आरोग्य यंत्रणेचे अपयश आहे. आपत्कालीन परिस्थितीत सर्व संबंधित घटकांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रकरणावर बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “रुग्णांना तातडीने उपचार मिळणे हा त्यांचा हक्क आहे. कोणत्या रुग्णालयात कोणती सेवा उपलब्ध आहे, याची माहिती डॅशबोर्डच्या माध्यमातून मिळाल्यास अशा घटनांची पुनरावृत्ती टाळता येईल. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here