*विक्रोळी येथील मार्गदर्शन शिबिरात आ. प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला विश्वास*
मुंबई – मुंबईतील मध्यमवर्गीय मराठी माणूस जो वसई, विरार, नालासोपाऱ्याला जाणार होता, तो आता स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईतच राहणार आहे, असा विश्वास मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. ते विक्रोळी (पूर्व) टागोर नगर ग्रुप १ येथील करुणा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतर्फे गुरुवारी आयोजित केलेल्या स्वयं पुनर्विकासावरिल मार्गदर्शन शिबिरात बोलत होते.
याप्रसंगी मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, संचालक आ. सुनील राऊत, माजी नगरसेवक चंद्रकांत निर्भावणे, विनायक शेजवळ, चंद्रकांत जाधव, रोशनलाल जैन, संजय सावंत, प्रदीप पगारे, सिद्धार्थ चंदनशिवे, पराग जाधव, सुहास बनसोडे, संदेश धोंदे, किशोर पवार यांसह मोठ्या संख्येने करुणा को-ऑप. सोसायटीतील रहिवाशी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. दरेकर म्हणाले की, स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला मोठे घर मिळतेय. स्वयं पुनर्विकास म्हणजे फार मोठी टेक्नोलॉजी नाही. स्वयं पुनर्विकासात एकही रुपया खिशातून घालावा लागत नाही. शासनाच्या सर्व परवानग्या विनाविलंब मिळतात. कारण मुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारचे शासनाचे निर्णय केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ शासन निर्णय स्वयं पुनर्विकासाच्या सवलतींचे केले. स्वयं पुनर्विकासात सभासद हा शेवटपर्यंत मालक असतो. सर्व सूत्र, नियंत्रण हे तुमच्या हातात असते. चांगले दर्जेदार बांधकाम करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तीन वर्षाच्या आत प्रकल्प उभा राहिला पाहिजे असा स्वयं पुनर्विकासाचा कायदा आणि नियम सरकारने केला असल्याचेही दरेकरांनी सांगितले.
दरेकर पुढे म्हणाले की, मुंबईत आज स्वयं पुनर्विकासाचे १६०० प्रस्ताव आमच्याकडे आले आहेत. २१ सोसायट्या उभ्या राहिल्या असून सर्व इमारतीत अडीच ते तीन वर्षात लोकं राहायला गेली आहेत. स्वयं पुनर्विकासात क्लस्टर आले आहे. एकापेक्षा जास्त इमारती एकत्र आल्या तर त्यांचा क्लस्टर पुनर्विकास होऊ शकतो. मुंबई जिल्हा बँकेकडे प्रस्ताव दिल्यानंतर मुंबई जिल्हा बँक सर्व फिजिबलिटी रिपोर्ट बघून कर्ज मंजूर करते. त्यानंतर प्रोसेसने इमारतीचे काम टप्प्याटप्प्याने सुरू होते. सर्व बाजूंनी स्वयं पुनर्विकासाचा फायदाच आहे. सर्वांनी विश्वासाने एकत्र या.”असे आवाहनही दरेकरांनी केले.
*कष्टकऱ्यांसाठी ही वसाहत उभारायची आहे*
*सर्वांनी एकत्र येऊन ही योजना यशस्वी करू*
दरेकर म्हणाले की, ” मी आपल्या सरकारमध्ये, प्राधिकरणाचा अध्यक्ष आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजाश्रय या योजनेला आहे. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ‘ तसे तुम्ही स्वतःचे घर स्वतः निर्माण करणार आहात. माझीही या मातीशी नाळ जोडलेली आहे. येथे राहणारा माणूस कष्टकरी, मध्यमवर्गीय आहे. म्हणून कष्टकऱ्यांसाठी ही वसाहत उभी करायची आहे. आपण सर्वजण मिळून ही योजना यशस्वी करू.” असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.
00000






















