उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी शनिवारी महाराष्ट्र लोकभवन येथे जैन दीक्षा महोत्सवाला उपस्थित राहून जैन साहित्य प्रदर्शनाचे उदघाटन केले.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह उपराष्ट्रपतींनी जैन तीर्थंकर मुर्ती व प्राचीन जैन साहित्याच्या प्रदर्शनाला भेट दिली.
भगवान महावीर यांची शिकवण आज पूर्वीपेक्षा अधिक प्रासंगिक आहे. आपल्या आचरणातून त्यांनी त्याग व साध्या राहणीचा संदेश दिला ,असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.
जैन धर्मात सर्वसंग परित्याग करुन समाज सेवा करण्याची श्रेष्ठ परंपरा आहे व ती अनुकरणीय आहे असे उपराष्ट्रपतींनी यावेळी सांगितले. तामिळनाडू राज्यात एकेकाळी दोन तृतीयांश लोक जैन धर्माचे पालन करीत होते असे सांगून जैन साधूंनी तामिळ साहित्यामध्ये फार मोठे योगदान दिले असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले.
जैन धर्माने भारतीय संस्कृतीचे संवर्धन करण्यात मोठे योगदान दिले आहे असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी सांगितले. जैन धर्मातील दीक्षा विधी हा सनातन संस्कृतीचा भाग असल्याचे सांगून उत्तर पुर्वेतील त्रिपुरा व नागालँड राज्यात देखील जैन समाज योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व संपत्तीवर पाणी सोडून संन्यास घेण्याची परंपरा केवळ भारतात आहे असे सांगून अहिंसा म्हणजे केवळ शारीरिक हिंसा नसून हिंसक विचार करणे देखील एक प्रकारे हिंसा असल्याचे राज्यपालांनी सांगितले. अहिंसा हाच खरा धर्म आहे असे सांगून अहिंसा यशाचा मार्ग प्रशस्त करते असे राज्यपालांनी सांगितले.
*जैन समाजाचे देशाच्या सकल उत्पन्नात सर्वाधिक योगदान – मुख्यमंत्री*
जैन समाजाचे देशाच्या सकल उत्पन्नात सर्वाधिक योगदान असून दानधर्म करण्यात देखील जैन समाजाचे योगदान फार मोठे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
जैन धर्मात केवळ मानवाच्या कल्याणाचाच नाही,तर जड आणि सूक्ष्म जीवांच्या कल्याणाचा देखील विचार केला आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जैन धर्मियांनी हाती घेतलेले हस्तलिखितांच्या संरक्षणाचे कार्य प्रशंसनीय असल्याचे सांगून जैन धर्मियांनी राज्यातील जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात देखील सहयोग करावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते जैन दीक्षा घेणाऱ्या युवकांचा तसेच जैन साहित्य संरक्षणासाठी सहयोग करणाऱ्या दात्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, श्री अध्यात्म परिवार ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त हितेंद्र मोता, विश्वस्त राजेश चंदन, विश्वस्त बाबुलाल भन्साळी उपस्थित होते.
दिनांक ८ फेब्रुवारी रोजी बोरिवली येथे विविध राज्यातील व विविध वयोगटातील १८ पुरुष व ४६ महिलांनी जैन दीक्षा घेतली. त्यानिमित्त जैन दीक्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
***



















