Home Trending Now परिवर्तनवादी विचारांची दीपज्योत विझली

परिवर्तनवादी विचारांची दीपज्योत विझली

17
0

सामाजिक उपक्रमांतून ‘तेरवी’ला दिला मानवतावादी अर्थ

तिवसा:
तिवसा तालुक्यातील एक संवेदनशील, अभ्यासू आणि परिवर्तनवादी व्यक्तिमत्त्व असलेल्या निर्वाणास्थ लीलादेवी माणिकराव माहोरे (वय ६२) यांचे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने माहोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी जपलेले विचार आणि संस्कार आज समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
‘दरारा’ या साप्ताहिकाचे संपादक प्रवीण उर्फ राज माहोरे यांच्या मातोश्री होत, तसेच ज्येष्ठ पत्रकार माणिकराव माहोरे यांच्या सहचारिणी होत्या.
त्यांच्या निधनानंतर माहोरे कुटुंबाने पारंपरिक तेरवी विधी टाळून, समाजोपयोगी कार्यातूनच त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा परिवर्तनवादी निर्णय घेतला
स्मृतिप्रीत्यर्थ दि २५ मार्च रोजी सामाजिक उपक्रमांची प्रभावी मालिका राबविण्यात येत आहे. यामध्ये देहदान संकल्प, रक्तदान, अनाथ मुलांच्या संस्थेत भोजनदान, वृद्धाश्रमात फळवाटप, बुद्ध विहारास वॉटर कूलर भेट, जखमी पशूंवर उपचार करणाऱ्या संस्थेला आर्थिक मदत अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. त्याचबरोबर आरोग्य तपासणी शिबिरे, हृदयरोग निदान शिबिर, रक्तगट व नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. संगीतमय स्वरांजली कार्यक्रमातूनही त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन करण्यात येत आहे.

या उपक्रमांमुळे तिवसा तालुक्यात एक नवा आदर्श निर्माण झाला असून, “श्रद्धांजली म्हणजे केवळ विधी नव्हे, तर समाजासाठी केलेले कार्य” हा संदेश ठळकपणे समोर आला आहे. अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमांचे मनापासून कौतुक करत, हा उपक्रम समाजाला दिशा देणारा असल्याचे मत व्यक्त केले आहे.
“माणूस जातो, पण त्याचे विचार आणि कार्य अमर राहतात…
आमची लीलादेवी माहोरे यांची स्मृती समाजसेवेच्या रुपाने सदैव जिवंत राहील.” असे राज माहोरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here