Home मुंबई *कार्यकर्त्याला न मागता दिलं जातं हेच शिवसेनेचं वचन*- *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे...

*कार्यकर्त्याला न मागता दिलं जातं हेच शिवसेनेचं वचन*- *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन*

38
0

*जागतिक महिला दिनानिमित्त महिला सेनेचा ‘शिवदुर्गा सन्मान सोहळा’*

*राज्यातील १० कर्तृत्ववान महिलांचा गौरव*

*राज्यसभा उमेदवार डॉ. ज्योती वाघमारे यांचा विशेष सत्कार*

मुंबई

“छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. बाळासाहेबांनीही अठरा पगड जातींना एकत्र केलं, तळागाळातील कार्यकर्त्यांना मोठी पदं देऊन बळ दिलं. बाळासाहेबांचे स्वप्न आणि विचाराने शिवसेना पुढे जातेय. शिवसेना वाढवण्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला न मागता दिलं जातं, हे शिवसेनेचं वचन आहे.” असे प्रतिपादन शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. डॉ. ज्योती वाघमारे यांना दिलेल्या राज्यसभेच्या उमेदवारीचा किस्सा यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितला. जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेनेच्या महिला सेनेकडून शीव येथील षण्मुखानंद सभागृहात ‘शिवदुर्गा सन्मान’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या सोहळ्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर, आमदार डॉ. मनीषा कायंदे, डॉ. ज्योती वाघमारे, कार्यक्रमाच्या संयोजिका शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, प्रवक्त्या व उपनेत्या शीतल म्हात्रे आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “ज्योती वाघमारे यांच्या रुपाने लाडकी बहिण राज्यसभेवर जाणार आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली अशा ठिकाणी आरक्षण नसताना महिलांना महापौर करण्याचा निर्णय घेतला. ज्योती वाघमारेंच्या ध्यानीमनी देखील नव्हते की त्या खासदार होतील. लाडकी बहिण योजनेसाठी दिल्लीत कमिटी करायची आहे , असे सांगून त्यांना कागदपत्र तयार करायला सांगितली आणि शेवटच्या दिवशी सही करताना वाघमारेंना समजले की हा राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज आहे.” असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. व्यक्तिगत इच्छा आकांक्षा, प्रश्न बाजूला सारत पक्षाला वेळ देणारे, जबाबदारी चोखपणे पार पाडणारे जिवाभावाचे कार्यकर्ते आपल्याला लाभले, ते साथ देतात हीच आपली ताकद आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

तिसऱ्यांदा खासदार झालेल्या डॉ. श्रीकांत यांना मंत्री करावं अशी सर्व खासदारांचा आग्रह होता, मात्र श्रीकांत यांनी नम्रपणे ते नाकारले आणि ज्येष्ठ कार्यकर्त्याला मंत्रीपद द्या अशी भूमिका घेतली, ही खरी शिवसेना आहे.”असे ते म्हणाले. “सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळेच, लाडक्या बहिणींच्या प्रेमामुळेच आज एकनाथ शिंदेंना राज्यभरात लोकप्रियता मान सन्मान मिळतोय.” अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, “स्त्री म्हणजे त्यागाची मूर्ती, परमेश्वराचे रुप आहे. स्त्री ही माऊलीच आहे. संत महात्म्यांचा अपवाद सोडल्यास कोणत्याही पुरुषाला माऊली होता येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना माऊली होता आलं. माऊली ही पदवी मिळवणं सोपी गोष्ट नाही. कर्तृत्व, त्याग, संयम, सहनशीलता यामुळेच माऊली होता येतं. आज जमलेल्या सर्व या माऊलीच आहेत.”असे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे लाडक्या बहिणींसमोर नतमस्तक झाले.

ते पुढे म्हणाले की, बचत गटांसाठी सरकारने अनेक निर्णय घेतलेत. आरोग्य विभागाने माता सुरक्षित अभियानाच्या माध्यमातून राज्यातील ३ कोटी महिलांची आरोग्य तपासणी केली. यात १० हजार महिलांना कर्करोगाचे निदान झाले होते. मात्र वेळीच खबरदारी घेतल्याने त्यांचे प्राण वाचवू शकलो.”असे ते म्हणाले. आरोग्य आपल्या दारी, माता सुरक्षित कुटुंब सुरक्षित, एचपीव्ही लसीकरण असे उपक्रम राबवले जात आहेत. उद्योग विभागाने आणि डीपीडीसीमधून कोळी महिलांना फूड ट्रक्स दिले. महिला सक्षमीकरणासाठी उद्योग विभागाने आणखी उपक्रम राबवावेत, असे ते म्हणाले. शिवसेनेच्या राज्यसभेच्या उमेदवार डॉ. ज्योती वाघमारे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. त्या म्हणाल्या की “सीम आणि डेडिकेटेड टू कॉमन मॅननंतर आता सामान्यांना असमान्य पदावर नेणारे नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. मुख्यमंत्री असताना महिलांना बहुमान मिळवून देण्याचे काम केले. स्त्री शक्तीचा सन्मान केला. देवाला सुद्धा नवस करावा लागतो, नवस न करता पावणारे म्हणजे एकनाथ शिंदे आहेत.” अशा शब्दांत डॉ. वाघमारे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

महिला सेनेकडून यावेळी विविध क्षेत्रातील १० कर्तृत्ववान महिलांचा शिवदुर्गा सन्मानाने गौरव करण्यात आला. यात सोनाली कोचरेकर, स्मिता बामणे, शुभांगी पाटील, डॉ. कांचन बागल, सुजाता कोम्मुवाडे, सुवर्णा साबळे, कोमल तायडे, दिप्ती इडेकर, स्नेहा गुज्जलवार, ॲड.वंदना शेरखाने यांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरव करण्यात आला. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी उद्योग विभागाकडून यावेळी ५० फूड ट्रक्सचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले.

चौकट
*लाडक्या बहिणी तलवार आहेत, समशेरीची धार आहेत*

“लाडक्या बहिणींमुळेच राज्यभरात शिवसेनेचा झंझावात सुरु आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सगळ्यांना पुढे काय होणार याची चिंता लागली होती, मात्र मुख्यमंत्री असल्याने महिलांसाठी लाडकी बहिण योजना आम्ही सुरु केली. विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लाडक्या बहिणींनी दाखवून दिलं की, त्या वार नाही तलवार आहेत, समशेरीची धार आहेत.” असे कौतुकोद्गार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी काढले. अडीच वर्षात राज्यात महिलांसाठी अनेक योजना सुरु केल्या. एसटीमध्ये महिलांना सवलत, मोफत उच्च शिक्षण, लेक लाडकी लखपती आणि नावासमोर आईचेही नाव लिहण्याचा ऐतिहासिक निर्णय या लाडक्या भावाने मुख्यमंत्री असताना घेतला. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे.” असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here