*मराठीला ज्ञानभाषा म्हणून पुढे नेण्याचे आवाहन, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती*
*विनोद व अस्मिता यांचा संघर्ष होऊ नये, मराठीला ज्ञानभाषा बनवू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
*”माय मराठीचं वैभव वाढवूया, सर्वांनी एकत्र प्रयत्न करुया” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
*मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी सरकार कटिबद्ध – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार*
*राज्य सरकारचा सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मराठीला अभिजात दर्जा – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*
*मराठी भाषेचे संरक्षण सर्वांची जबाबदारी, शिक्षण-तंत्रज्ञानात मराठीला प्राधान्य देणार – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर*
मुंबई
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणारा ‘मराठी भाषा गौरव दिन’ विधान भवनात उत्साहपुर्ण वातावरणात साजरा झाला. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे आयोजित ‘जावे विनोदाच्या गावा’ या विशेष कार्यक्रमात अभिजात मराठी साहित्यातील विनोदी साहित्याचे अभिवाचन, संवाद आणि सांस्कृतिक सादरीकरण झाले.
यावेळी वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित ‘लोकसेवेचा लोकजागर’ या ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते झाले.
कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, विधिमंडळ मराठी भाषा समिती प्रमुख आशुतोष काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठी भाषा ही ज्ञानभाषा म्हणून पुढे यायला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रमाण भाषेचे महत्त्व शिकवले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिजात दर्जा देऊन राजाश्रय दिला. भाषेचा गोडवा टिकवायला हवा आणि तिचे साहित्य लोकांपर्यंत पोहोचवायला हवे. लोककला आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी जिवंत ठेवायला हवी.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले, “मराठीला हजारो वर्षांची परंपरा आहे. आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे हे विनोदाचे दोन शिखर आहेत. खान्देशी, कोंकणी, अहिरणी या सर्व मराठीच्या बहिणी आहेत. अभिजात दर्जा टिकवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. तंत्रज्ञानाच्या काळातही माय मराठीचे वैभव वाढवण्यासाठी एकत्र प्रयत्न करूया.”
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी राज्य शासनाच्या विविध उपक्रमांचा उल्लेख केला.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वागतपर भाषणात राजकारणात विनोदाच्या मर्यादांचा मिश्किल उल्लेख केला. तसेच याच विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषा सर्व शाळांमध्ये अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी देखील व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, मंत्री उदय सामंत यांसह राज्यातील अनेक खासदारांनी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा केला आणि पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी आभार मानले व मराठीसाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तंत्रज्ञान युगातही मराठी शिक्षण आणि जतनाची जबाबदारी अधोरेखित केली.
कार्यक्रमाची सुरुवात ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या गीताने झाली. पुल. देशपांडेंच्या ‘माझा शत्रूपक्ष’ चे ऋषिकेश जोशी यांनी, जयवंत दळवींच्या ‘जगी हा खास वेड्यांचा पसारा’ चे केदार शिंदे यांनी अभिवाचन केले. विंदा करंदीकर यांच्या निवडक कवितांचे वाचनही झाले. ‘आचार्य अत्रे व पु. ल. देशपांडे : विनोदाची दोन शिखरे’ या विषयावर मिलिंद जोशी यांनी संवाद साधला. लोकगीतांचे सादरीकरणही झाले.
कार्यक्रमाची संकल्पना उत्तरा मोने यांची, तर सूत्रसंचालन धनश्री दामले यांनी केले.
हा कार्यक्रम मराठी भाषेच्या सांस्कृतिक वैभवाला उजागर करणारा ठरला असून, उपस्थित मान्यवरांनी मराठीच्या संवर्धनासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.






















