*राष्ट्रीय अध्यक्ष पदाची घोषणा प्रफुल पटेल यांनी केली तर अनुमोदन सुनिल तटकरे यांनी दिले…*
*अधिवेशनात पार्थ पवार यांची राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून घोषणा…*
मुंबई दि. २६ फेब्रुवारी – दादांनी या पक्षाला ज्या आत्मियतेनं… ज्या जिव्हाळयाने आणि ज्या पध्दतीने एक कुटुंब म्हणून जपलं, त्याच पध्दतीने, काकणभरही कमी न पडू देता, मी या पक्षाला-म्हणजेच आपल्या या कुटुंबाला सांभाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन असे सांगतानाच ‘उतणार नाही… मातणार नाही… घेतला वसा टाकणार नाही…असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात दिला.
आदरणीय दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी आपण जीवापाड प्रयत्न करूया असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी यावेळी केले.
मैं आपकी बेटी, आपकी बहन, आपकी साथी बनकर – हमेशा आपके साथ खडी रहूंगी ऐसा वचन सुनेत्रा पवार इन्होने दिया ।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आज वरळी येथे पार पडले.
हिंदवी स्वराज्य के संस्थापक युगपुरुष छत्रपति शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपति संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, छत्रपति राजर्षी शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर, क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद इन महानुभावोंको मैं अभिवादन करत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष पद की जिम्मेदारी मुझे सौंपकर, आप सभी नेताओं और कार्यकर्ताओं ने मुझपर जो विश्वास व्यक्त किया है, उसके लिए मैं तहे दिल से आपका आभार व्यक्त करती हूँ।
यह मेरे लिए केवल एक पद नहीं, बल्कि लाखों कार्यकर्ताओं की आशाओं, विचारों और संघर्षों की जिम्मेदारी है और सेवा करने का एक बडा अवसर है । आपका विश्वास ही मेरी सबसे बडी ताकत है । मैं विश्वास दिलाती हूँ कि पार्टी की विचारधारा, जनसेवा की परंपरा और संगठन की ताकत को, और अधिक मजबूत करने के लिए पूरी निष्ठा और समर्पण के साथ कार्य करूंगी।
आपल्या सर्वांचे नेते, मार्गदर्शक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादांच्या जाण्याने झालेल्या दुःखातून आपण सर्व अजूनही सावरलेलो नाही. त्यांच्या जाण्याने आपल्या सर्वांच्या आयुष्यात आणि पक्षात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरुन येणं शक्य नाही, याची आपल्या सर्वांना जाणीव आहे. आज आपल्या प्रत्येकाच्या मनात एकच नाव आहे…. अजितदादा. ते आयुष्यभर महाराष्ट्राच्या विकासासाठी, शेतकरी, युवक, महिला आणि आपल्या पक्षासाठी झटत राहिले.
उनका सपना अधुरा नहीं रहेगा,
हम सब मिलकर उसे और भी ऊँचाइयों तक लेकर जायेंगे. आदरणीय दादा आज आपल्यात नाहीत, हा आघात प्रचंड मोठा आहे… मात्र यातून आता आपल्याला बाहेर पडलं पाहिजे…आपल्याला आता सावरलं पाहजे… कारण आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ एक पक्ष नाही, तर तो एक विचार आहे, एक परिवार आहे.
महाराष्ट्राच्या समृध्दीचा, देशाच्या परिवर्तनाचा, महत्वाचं म्हणजे तुमच्या-आमच्या सर्वांच्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा विचार करणारा पक्ष आहे. हा विचार पुढे नेण्यासाठी, या कठीण काळातही आपल्याला निर्धारानं पुढं जावं लागेल.आदरणीय दादांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही… हे सत्य आहे. पण त्यांनी दिलेला विचार, त्यांनी दाखवलेला विकासाचा मार्ग, त्यांनी घडवलेला कार्यकर्ता… हीच राष्ट्रवादी काँग्रेसची खरी ताकद आहे.30 जून 2023 रोजी आदरणीय दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती… आदरणीय दादांना राष्ट्रीय अध्यक्षपदाचा साधारणपणे अडीच वर्षाचा कालावधी मिळाला. या कालावधीत त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. पक्षाचा विस्तार केला. प्रत्येक कार्यकर्त्याला बळ दिलं. कष्ट, समर्पण आणि काटेकोर नियोजनाने पक्षाची ताकद वाढवली…
आदरणीय दादांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या कालावधीत लोकसभा, महाराष्ट्र विधानसभा, (अरुणाचल प्रदेश, दिल्ली, जम्मू-काश्मिर, बिहार राज्यातल्या विधानसभा) महाराष्ट्रातल्या महानगरपालिका, नगरपालिका आणि 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या.
या कालावधीत अनेक संकटं, तांत्रिक अडचणी असतानासुध्दा आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दमदार कामगिरी केली आहे. या अडीच वर्षाच्या अल्पावधीतसुध्दा त्यांनी आपलं नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर सिध्द केलं.
❖ आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, देशाच्या मातीशी, माणसांशी नातं सांगणारा, जनतेशी नाळ जुळलेला पक्ष आहे. देशाची निर्मिती संघर्षातून झाली, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही संघर्षातून स्थापन झाला आणि संघर्ष करतंच मोठा झाला.
❖ तब्बल 27 वर्षांची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करत आपला पक्ष आज तारुण्यात आहे. आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे, उत्साह आहे. या उत्साहाला योग्य दिशा देण्याचं काम आपल्याला करायचं आहे.
❖ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून मीसुध्दा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या सर्वांच्या प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलेली आहे. राजकारण आणि समाजकारण माझ्यासाठी नवं नाही.
आदरणीय दादांसारख्या वादळासोबत मी चाळीस वर्षे संसार केला आहे. त्यामुळं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी कठीण असली, तरी तुमच्या सर्वांच्या साथीनं ती अजिबात अशक्य नाही… याचा मला विश्वास आहे. हा अध्यक्षपदाचा सन्मान केवळ माझा नसून, तळागाळात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, माता-भगिनींचा सन्मान आहे, आदरणीय दादांनी आयुष्यभर‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांचा विचार जपला… या विचारांत कधीही तडजोड केली नाही.
नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला. तोच वारसा, तोच विचार आपल्याला पुढं न्यायचा आहे. समाजातल्या कोणत्याही घटकाला आपण वाऱ्यावर सोडणार नाही. सर्वांना सोबत घेऊन काम करायचं आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आज मी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असले तरी, खरं तर राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा राष्ट्रीय अध्यक्षच आहे… याच भावनेतून आपण सर्वांनी काम करायचं आहे.आपल्याला पुन्हा एकदा आपल्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून द्यायचा आहे. ग्रामीण भागात आपल्या पक्षाची मुळे घट्ट आहेत…आता शहरी भागातही आपल्याला जनतेचा विश्वास संपादन करायचा आहे… तिथंसुध्दा आपल्याला आपला पक्ष वाढवायचा आहे. पक्षातल्या तरुण कार्यकर्त्यांना संधी देऊन, त्यांच्या पाठीशी बळ उभं करण्याचं काम आपण करणार आहे.कृषी, सहकार, उद्योग, शिक्षण, क्रीडा, युवक आणि महिला सक्षमीकरण या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला आघाडी घ्यायची आहे. या क्षेत्रात काम करायचं आहे. आज महिलांची लोकसंख्या ५० टक्क्यांच्या आसपास आहे. महिला या देशाच्या विकासाचं इंजिन आहेत. या प्रवासात कोणीही मागे राहू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे. लाडकी बहिण योजना आपण आणली आहे. म्हणून आपली जबाबदारी इथंच संपत नाही. महिला सक्षमीकरण, आर्थिक सबलीकरण आणि प्रशासनात त्यांचा सहभाग वाढावा यासाठी आपल्याला पक्ष म्हणून विशेष काम करावं लागणार आहे. शेतकरी हा आपला महत्वाचा घटक आहे. शेती अधिक किफायतशीर आणि फायदेशीर कशी होईल, यासाठी आदरणीय दादांनी एआय तंत्रज्ञानावर सातत्यानं भर दिला होता.शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणं, त्यांना तंत्रज्ञानाची- जोडधंद्याची जोड देणं यासाठीही दादांनी विशेष प्रयत्न केले.आदरणीय दादांच्या जाण्याने… आपल्या सर्वांच्यावर येणारी प्रत्येक संकटं स्वत:च्या अंगावर झेलणारा… सह्याद्री आता आपल्यात राहिला नाही. पण त्या सह्याद्रीने दिलेला विचार, शिकवण, ती जिद्द आपल्याला पुढं न्यायची आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारत असताना… आज माझ्या डोळ्यासमोर स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महाराणी ताराबाई आणि माझ्या आजे सासू शारदाबाई पवार यांचा वैचारिक वारसा माझ्यासोबत आहे. आदर्श आहे. या आदर्शाच्या कार्य कर्तुत्वाकडे बघत ही जबाबदारी स्वीकारत असल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
अजितदादा पवार एक महान व्यक्तिमत्व होते त्यांच्यामुळे पक्षाला देशात आणि राज्यात वेगळे स्थान मिळाले आहे. जीवनभर तपस्या केली म्हणून दादा महान होते. त्यांचा आदर्श ठेवून आपल्याला काम करायचे आहे असे आवाहन राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी केले.
२८ जानेवारी रोजी अचानक आपल्यातून दादा निघून गेले. हे आपल्याला धक्कादायक होते. दादांनी आपल्या सगळ्यांना आधार दिला होता. कार्यकर्त्यांसाठी आणि पक्षासाठी मनात तळमळ होती. प्रत्येकाचे दु:ख जाणून घेत होते. पक्षासाठी सैनिकांसारखे नेतृत्व दादांनी केले अशा शब्दात प्रफुल पटेल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारावर चालणार हे दादांनी त्याचवेळी जाहीर केले होते. तीन राज्यात आपला पक्ष वाढला आहे अजून एका राज्यात सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करेल त्यावेळी आपल्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त करायचा आहे असेही प्रफुल पटेल म्हणाले.
आमचा नेता… आमचा दादा… मग आम्ही ठरवणार कुणाला नेता करायचे ते. वहिनींना विधीमंडळ नेता म्हणून निवडला. हा योग्य निर्णय योग्य वेळी घेतल्याबद्दल आमदारांचे प्रफुल पटेल यांनी आभार मानले.
यावेळी श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी नाव जाहीर केले आणि अनुमोदन सुनिल तटकरे यांनी दिले.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हात उंचावून सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या नावाला सर्वांनी पाठींबा दिला.
कर्तव्य म्हणून उद्याची जबाबदारी धिरोदत्तपणाने घेऊन एक वेगळा आत्मविश्वास निर्माण केला अशा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अभिनंदन केले.
वलयांकित नेतृत्व म्हणून राज्याने, देशाने दादांकडे पाहिले. त्यामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस विस्तारला. दादा एक निखळ व्यक्तीमत्व होते. अनेकांनी दादांच्या सकाळी उठण्यावर टिका केली होती. पण त्या टीकाकारांना दादांनी आपल्या कामातून उत्तर दिले असेही सुनिल तटकरे म्हणाले.
दादांच्या निधनानंतर आम्ही
राजधर्म आणि धर्मशास्त्र पाळण्याचे काम केले आणि आमची नियत साफ आहे. ज्यांना टिका करायची त्यांनी करावी आम्ही टिकेचे धनी झालो तरी चालेल परंतु आम्ही दादांच्या चरणी निष्ठा ठेवली आणि कायम सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी राहणार आहोत असे सांगतानाच सुनेत्रा पर्व आजपासून सुरु झाले आहे असे जाहीर केले.
टीकाटिपण्णीपेक्षा अजितदादांचे शिलेदार म्हणून पक्षाची शिस्त बाळगून दादांनी जोपासलेले कार्य कार्यकर्त्यांनी पुढे न्यायला हवे असे आवाहन सुनिल तटकरे यांनी केले.
यावेळी खासदार प्रफुल पटेल यांनी मांडलेल्या ठरावाला सुनिल तटकरे यांनी पाठिंबा दिला.
वहिनींच्या शपथविधीसाठी इतकी घाई का होती असा प्रश्न करण्यात आला मग दादांच्या अंत्यविधीच्या वेळी का मिडिया मध्ये चर्चा केली गेली असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केला.
दादांच्या खांद्याला खांदा लावून सुनेत्रा पवार काम करत होत्या. मात्र तरीही त्या नवख्या आहेत अशी टिका केली जात आहे अरे बाबांनो आम्ही आहोत ना सोबत असे खडेबोल छगन भुजबळ यांनी सुनावले.
देशात व राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचे दादांचे स्वप्न होते ते पूर्ण आपल्याला करायचे आहे. आपल्याला दादा बनता येणार नाही. पण त्यांच्या कामाप्रती आदर राखून काम करायचे आहे असे आवाहनही छगन भुजबळ यांनी केले.
आपण एकत्र राहिलो तर आपल्याला कोण तोडू शकत नाही. महाराष्ट्रात व देशात पक्षाला मोठ्या प्रमाणावर वाढवायचे आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने वहिनीला साथ दिली तर दादांचे स्वप्न पूर्ण होणार आहे असेही छगन भुजबळ म्हणाले.
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही आपले विचार मांडले.
या अधिवेशनात राज्यसभेसाठी पार्थ अजित पवार यांचे नाव राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी जाहीर केले.
या अधिवेशनाला देशभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, प्रमुख कार्यकारिणी पदाधिकारी, मंत्री, आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार उपस्थित होते.


















