*· उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार लोकार्पण*
ताडदेव – नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणाऱया रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवार, दि २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
दक्षिण मुंबईतील मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेव या भागांना पुर्व – पश्चिम भागांना जोडणाऱ्या या पुलावरून दोन्ही दिशेने वाहतूक सुरु होऊन नागरिकांना सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे.
राज्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार; कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा तसेच स्थानिक खासदार अरविंद सावंत, आ. अमीन पटेल, आ.सुनिल शिंदे, आ
राजहंस सिंह, उप महापौर संजय घाडी, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह विविध मान्यवरांची या सोहळ्यास उपस्थिती असणार आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वाखाली पूल विभागाचे अभियंते यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाची उभारणी विक्रमी कालावधीत म्हणजेच अवघ्या १५ महिने ६ दिवसांत पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, निविदा अटी – शर्तींनुसार या उड्डाणपुलाच्या कामासाठी अजून ४ महिन्यांचा अवकाश आहे. या पुलाच्या बांधकामाचा कार्यादेश (Work Order) सप्टेंबर २०२४ मध्ये देण्यात आला. तर, प्रत्यक्ष कामकाजास १ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरूवात झाली. रेल्वे रूळांवरील कामे रेल्वे विभागामार्फत तर तुळयांचे मजबुतीकरण (Girder Bracing), पुलाच्या प्रवास पृष्ठभागाची रचना (Deck Sheet), स्लॅब कास्टिंग, दोन्ही पोहोच मार्गांची कामे महानगरपालिकेने पूर्ण केली आहेत. महानगरपालिका पूल विभाग (Bridges Department), रेल्वे विभाग, स्थानिक प्रशसकीय विभाग कार्यालय (Ward Office) आणि वाहतूक पोलिस यांच्यातील उत्कृष्ट समन्वय, नियोजनबद्ध कार्यपद्धती व अहोरात्र परिश्रमांमुळे हा उड्डाणपूल प्रकल्प मुदतीपुर्वी यशस्वीरित्या पूर्ण करणे शक्य झाले आहे.
दक्षिण मुंबई परिसरातील वाहतुकीसाठी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील पूल महत्त्वाचा आहे. मुंबई सेंट्रल स्थानकानजीक रेल्वे मार्गावरील १३० वर्ष जुना ब्रिटिशकालीन उड्डाणपूल धोकादायक जाहीर झाल्यानंतर पुलाचे निष्कासन करण्यात आले. मध्य रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाची विक्रमी वेळेत पुनर्बांधणी केली आहे. महानगरपालिका पूल विभाग, स्थानिक विभाग कार्यालयाच्या प्रयत्नांना रेल्वे विभागाचे अभियंते, वाहतूक पोलिस अधिकारी यांची मोलाची साथ लाभली.
या पुलाचे काम पूर्ण करणे आव्हानात्मक होते. कामाची अंमलबजावणी सुरू असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यात ‘बेस्ट’ वाहिन्यांचे स्थलांतरण, पूल बांधकामास अडथळा ठरणारी निवासी बांधकामे हटवून पर्यायी घरांचे वाटप करणे, पुलानजीकच्या एका गृहनिर्माण संस्थेची (Housing Society) बाधित होणारी सीमाभिंत हटविणे, माननीय उच्च न्यायालयासमोरील खटला आदींचा समावेश होता. सर्व अडथळ्यांवर मात करत प्रकल्प कामकाजास कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता सर्व अभियंत्यांनी घेतली. सर्व कामाची आखणी नियोजनबद्धपणे केल्याने पावसाळ्याच्या ४ महिन्यांच्या कालावधीत देखील काम अविरत सुरू होते. त्यामुळे बेलासिस पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपुर्वी पुर्ण करण्यात यश मिळाले आहे. भार चाचणी (Load Test), संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र (Structural Stability Certificate), सुरक्षा प्रमाणपत्र तसेच पुल कार्यान्वित करण्यासाठी रेल्वे विभागाचे ना – हरकत प्रमाणपत्रप्राप्त झाले आहे. एकंदरीत, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यास सज्ज आहे.
*पुलाची रचना*
– पुलाची एकूण लांबी ३३३ मीटर
– पैकी पुर्वेला १३८.३९ मीटर आणि पश्चिमेला १५७.३९ मीटर
– रेल्वे हद्दीत ३६.९० मीटर अशी विभागणी
– वाहतूक मार्ग (Carriage Way) लांबी ७ मीटर
– दोन्ही बाजूला पुरेशा रुंदीचे पदपथ (Foothpath)
*उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे फायदे -*
– दक्षिण मुंबईतील मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेव या पूर्व – पश्चिम भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा
– पुलाच्या पुनर्बांधणीमुळे दोन वर्षांपासून बाधित झालेली पुर्व – पश्चिम वाहतुकीसाठीची सुविधा पुन्हा प्रस्थापित होणार
– जहांगीर बोमन बेहराम मार्ग (पुर्वीचे बेलासिस मार्ग), डॉ. दादासाहेब भडकमकर मार्गावरील (ग्रॅन्ट रोड), विशेषतः पठ्ठे बापूराव मार्ग व महालक्ष्मी स्थानक पुलावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार
***

















