मुंबई: शनिवारी मुलुंडमध्ये भीषण दुर्घटना झाली. मुलुंडमध्ये मेट्रोचं काम प्रगतीपथावर आहे मात्र शनिवारी एलबीएस मार्गावर मेट्रोचा पिलरचा भाग कोसळून भयानक घटना घडली . या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर जनतेतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
या प्रकरणी कंत्राटदाराला ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे .तसेच जनरल कन्सल्टंटला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त अश्विन मुगदल यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी दुर्घटनास्थळी भेट दिली, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलले.
मुगदलांनी सांगितले की, “याप्रकरणी कोणालाही सोडले जाणार नाही, प्रकरणाची संपुर्ण चौकशी केली जाईल, ही चौकशी पुर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने होईल. सर्व तक्रारींवर कारवाई सुरु करण्यात आली आहे”, असेह त्यांनी यावेळी सांगितले. “एमएमआरडीएकडून या दुर्घटनेची सखोल चौकशी केली जाणार असून संबंधितांवर पुढे कारवाई केली जाईल”, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आह
*मुख्यमंत्र्यांनीही दिले चौकशीचे आदेश*
दरम्यान, दुर्घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संबंधित प्रकरणाच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत. तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत दिली जाईल आणि जे जखमी आहेत त्यांच्यावरील उपचारांचा खर्च हा सरकारच्या माध्यमातून केला जाईल,असं स्पष्ट केले आहे. याबद्दल त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला आहे आणि त्यांच्या समाज माध्यमावरही याबाबतची माहिती दिली.
याप्रकारच्या घटना घडतात तरी कशा, आणि काम सुरु असताना नागरिकांच्या सुरक्षेचा विचार का केला जात नाही अशा प्रकारची नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
















