Home Uncategorized *इंद्रायणी प्रदूषणमुक्तीसाठी सांडपाणी प्रक्रिया यंत्रणांची कठोर अंमलबजावणी करा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे...

*इंद्रायणी प्रदूषणमुक्तीसाठी सांडपाणी प्रक्रिया यंत्रणांची कठोर अंमलबजावणी करा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रशासनाला सूचना*

56
0

​आळंदी (दि.१३): श्री क्षेत्र आळंदी येथे वद्य एकादशीच्या निमित्ताने इंद्रायणी घाटावर आयोजित करण्यात आलेली इंद्रायणी मातेची दिव्य महाआरती विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हजारो भाविकांच्या साक्षीने उत्साहात संपन्न झाली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते महाद्वार नूतनीकरण कामाचा शिलापूजन समारंभही पार पडला. या भक्तीमय सोहळ्यासोबतच त्यांनी इंद्रायणी नदीच्या वाढत्या प्रदूषणाबाबत तीव्र चिंता व्यक्त करत प्रशासनाचे कान टोचले.

​श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात टाळ-मृदंग, विणा आणि ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात इंद्रायणी मातेचे पूजन व अभिषेक करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “वारकऱ्यांची श्रद्धा असलेल्या इंद्रायणी नदीत रासायनिक सांडपाणी मिसळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. अनेक ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) आणि औद्योगिक क्षेत्रातील ईफ्ल्युएंट ट्रीटमेंट प्लांट (ETP) केवळ कागदोपत्री दाखवले जातात, परंतु प्रत्यक्षात ते पूर्ण क्षमतेने कार्यरत नाहीत.”

​प्रदूषणमुक्तीच्या संकल्पाबाबत बोलताना त्यांनी राज्य नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री कै.अजित पवार आणि आता सुनेत्रा अजित पवार हे आळंदीच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत प्रयत्नशील आहेत. इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्यासाठी देखील त्यांचे सतत लक्ष असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच हे सर्व प्रश्न मार्गी लागतील असा मला ठाम विश्वास आहे.”

​यावेळी त्यांनी महाबळेश्वर येथील वेण्णा लेक प्रदूषणप्रकरणी शासनाने घेतलेल्या कठोर निर्णयाचा दाखला देत, इंद्रायणीच्या स्वच्छतेसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पीएमआरडीए प्रशासन, पोलीस आणि ग्रामस्थांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. “येणाऱ्या अधिवेशनात मी स्वतः या विषयावर सभागृहात पाठपुरावा करणार असून शासन स्तरावर प्रयत्न केले जातील,” असेही त्यांनी नमूद केले.

​या कार्यक्रमास पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, विश्वस्त भावार्थ देखणे, कबीरबुवा चैतन्य लोंढे, पुरुषोत्तम पाटील, ॲड. रोहिणी पवार, मुख्याधिकारी खांडेकर, जेहलम जोशी, रश्मी जोशी आणि गोविंद गिरी महाराज यांसह अनेक मान्यवर व हजारो वारकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here