Home मुंबई शहीद विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत कायम करा; अनिल देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना...

शहीद विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत कायम करा; अनिल देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

51
0

मुंबई: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, अशी आग्रही मागणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पार्श्वभूमी: २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजितदादा पवार यांच्यासोबतच त्यांचे निष्ठावान अंगरक्षक विदीप जाधव यांचेही निधन झाले. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी अनिल देशमुख यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगाव या विदीप जाधव यांच्या मूळ गावी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीदरम्यान जाधव कुटुंबाने विदीप यांच्या पत्नीच्या नोकरीबाबतची कैफियत मांडली होती. तसे पत्र सुध्दा संध्या जाधव यांनी अनिल देशमुख यांना दिले होते. त्याची प्रत सुध्दा अनिल देशमुख यांनी लिहीलेल्या पत्रासोबत जोडली आहे.
पत्रातील प्रमुख मागण्या:
सध्याची स्थिती: विदीप जाधव यांच्या पत्नी संध्या जाधव या सध्या ‘छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा (ठाणे)’ येथे ‘औषध निर्माण अधिकारी’ (Pharmacist) म्हणून कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती २०२० मध्ये ‘कोविड भरती’ अंतर्गत तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आली होती.
कायमस्वरूपी नियुक्तीची मागणी: विदीप जाधव यांनी राज्यासाठी दिलेले बलिदान आणि कुटुंबाची ढासळलेली आर्थिक परिस्थिती पाहता, त्यांच्या पत्नीला मानवतावादी दृष्टिकोनातून ‘विशेष बाब’ म्हणून शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे.
पात्रता आणि अनुभव: संध्या जाधव यांची शैक्षणिक पात्रता आणि त्यांनी कोविडच्या कठीण काळात दिलेली रुग्णसेवा विचारात घेऊन हा निर्णय घेण्याची विनंती पत्रात करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या प्रतिलिपी: अनिल देशमुख यांनी या पत्राच्या प्रतिलिपी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर तसेच ठाणे महानगरपालिका आयुक्तांना देऊन या प्रकरणाचा गांभीर्याने पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे.
“स्व. विदीप जाधव यांनी दिलेली दीर्घकालीन सेवा आणि त्यांच्या कुटुंबावर ओढवलेला हा आघात लक्षात घेता, त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेत स्थैर्य देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे विशेष लक्ष देऊन तातडीने आदेश द्यावेत,” अशी भावना अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here