Home Uncategorized *मुंबई पुष्पोत्सवात फुलांनी नटलेली संगीत वाद्यांची प्रतिकृती फेडणार डोळ्यांची पारणे*

*मुंबई पुष्पोत्सवात फुलांनी नटलेली संगीत वाद्यांची प्रतिकृती फेडणार डोळ्यांची पारणे*

59
0

*मुंबई पुष्पोत्सवात फुलांनी नटलेली संगीत वाद्यांची प्रतिकृती फेडणार डोळ्यांची पारणे

*वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून मुंबई पुष्पोत्सवाचा बहर*

*पाना-फुलांनी सजविले जाणार टाळ-मृदुंग, सतार अन् सनई-चौघडा*

फेब्रुवारी महिना उजाडला की मुंबईकरांचे लक्ष असते ते मुंबई पुष्पोत्सवाकडे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात दि.६ फेब्रुवारी ते दि.८ फेब्रुवारी २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत यंदाचा पुष्पोत्सव भरविण्यात येणार आहे. दरवर्षी हा उत्सव एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित असतो. यंदाच्या पुष्पोत्सवात संगीत विश्वातील विविध वाद्यांची प्रतिकृती विविधरंगी पाना-फुलांनी साकारण्यात येणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात दि. ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई पुष्पोत्सवाचे यंदाचे हे २९ वे वर्षे आहे. सलग तीन दिवस सुरू राहणाऱ्या या पुष्पोत्सवाचा मुंबईकरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता मुंबई पुष्पोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील. उर्वरित दोन दिवस म्हणजेच दि.७ आणि ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ‘मुंबई पुष्पोत्सव’ नागरिकांसाठी खुला असेल. यंदाचा हा २९वा पुष्पोत्सव आहे. आतापर्यंत या पुष्पोत्सवात कार्टून, आमची मुंबई, संगीत, सेल्फी पॉईंट, डिस्ने लँड, जलजीवन, अॅक्वाटीक वर्ल्ड, अॅनिमल किंग्डम, भारताची राष्ट्रीय प्रतीके आदी संकल्पनांवर आधारित फुलांची सजावट करण्यात आली आहे.

संगीत मैफिलीत आपण बासरी, वीणा, टाळ- मृदुंग, सतार, सनई-चौघडा, हार्मोनियम, पखवाज, तबला, तुतारी, सेक्साफोन, गिटार आदींसारख्या संगीत वाद्यांतून आतापर्यंत मधून स्वर झंकारलेले ऐकले असतील. त्यात मंत्रमुग्धही झाले असाल. पण आता याच वाद्यांतून यंदाच्या मुंबई पुष्पोत्सवात मन मोहून टाकणारा सुगंध दरवळणार आहे. यंदाच्या मुंबई पुष्पोत्सवात यंदा संगीत वाद्यांच्या प्रतिकृती पाना-फुलांनी साकारण्यात येणार आहेत. यामध्ये बासरी, वीणा, टाळ- मृदुंग, सतार, सनई-चौघडा, हार्मोनियम, पखवाज, तबला, तुतारी, सेक्साफोन, गिटार आदींची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.

मुंबई पुष्पोत्सवाची खासियत म्हणजे आपल्याला एकाच छताखाली वेगवेगळ्या रंगांची, सुगंधाची फुलझाडे पहावयास मिळतात. त्यासाठी महानगरपालिकेचा उद्यान विभाग विशेष परिश्रम घेत असतो. रोपांची लागवड, त्यांची निगा राखणे, त्यांची सजावट करणे आदी गोष्टींवर उद्यान विभागाचे अधिकारी-कर्मचारी लक्ष ठेवून असतात, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here