जनक्षोभ लक्षात घेता भाजपाने २४तासात घेतला राजीनामा
बदलापूर
बदलापूरमधील वादग्रस्त लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या शाळा व्यवस्थापन समितीचा सचिव तुषार आपटेला अखेर नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा लागला.
आपटेच्या नियुक्तीमुळे विरोधकांकडून आणि सामान्य जनतेकडून भाजपावर मोठी टीका होत होती, ज्यामुळे पक्षाला आपलाच निर्णय मागे घ्यावा लागला.
भाजपाने त्यांच्या नियुक्तीनंतर झालेला प्रचंड विरोध पाहून ही कारवाई अवघ्या २४ तासात केली .
*काय आहे बदलापुुरचा विषय?*
बदलापूरमधील एका प्रसिद्ध शाळेत २०२४ साली दोन लहान चिमुरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे संपुर्ण महाराष्ट्र हादरला होता. नंतर शाळेतील स्वच्छता कर्मचारी अक्षय शिंदे याने चौथीतील एका चिमुरडीवर स्वच्छतागृहात अत्याचार केल्याचे समोर आले होते.
या घटनेनंतर बदलापुरकरांनी ‘रेल्वे रोको’ करत आपला संताप व्यक्त केला, अनेक दिवस शहर बंद राहिले होते.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे दिसत असला, तरी शाळेच्या व्यवस्थापनावरही गंभीर आरोप करण्यात आले होते. शाळेचा सचिव म्हणून तुषार आपटे याच्यावर या प्रकरणात गांभीर्याने लक्ष न दिल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
या प्रकरणातील पीडित मुलीच्या पालकांनी शाळा प्रशासनाने सुरुवातीला या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटेवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले होते.
गुन्हा दाखल होताच हे दोन्ही पदाधिकारी फरार झाले होते. जवळपास ३५ दिवस पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेने त्यांना कर्जत येथील एका फार्महाऊसमधून अटक केली होती.
*राजकीय बक्षीस भारी पडले.*
नुकत्याच झालेल्या बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी तुषार आपटे यानी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
याच मदतीचे बक्षीस म्हणून भाजपाने त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड केली होती. मात्र, एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आणि अत्यंत संवेदनशील प्रकरणातील आरोपीला लोकप्रतिनिधी बनवल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त होऊ लागला. समाज माध्यमातून तसेच राजकीय क्षेत्रातूून भाजपाला लक्ष्य करण्यात आले.
*नामुष्की टाळण्यासाठी कारवाई*
वाढता विरोध आणि जनक्षोभ लक्षात घेता भाजपाने आपली प्रतिमा सावरण्यासाठी तुषार आपटे याना राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यानुसार आपटेने राजीनामा सादर केला . बदलापूर प्रकरणातील जखमा अजूनही ताज्या असताना अशा प्रकारच्या नियुक्तीमुळे पक्षाची मोठी नाचक्की झाली होती. अखेर या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी पक्षाने ही कारवाई केल्याचे मानले जात आहे.


















