Home पुणे पुण्यात ‘पाताळ लोक’ तयार करणार!- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्यात ‘पाताळ लोक’ तयार करणार!- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

64
0

पुणे – पुण्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला असून याठिकाणी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आम्ही ‘पाताळ लोक’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुण्यात भाजपा उमेदवारांच्या प्रचारसभेत फडणवीस बोलत होते.यावेळी पुण्यातल्या विकास कामांची
देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांंना सविस्तर माहिती दिली.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, “एकीकडे मेट्रोचे जाळे आणि दुसरीकडे ४ हजार इलेक्ट्रिक बस आपण घेतोय. पुण्यातल्या ३२ रस्त्यांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. ‘एआय’ चा वापर करून इथल्या वाहतूक कोंडीवर काय उपाय योजना करता येतील हे शोधून काढले आहे. एकूण ८ उड्डाणपुलांचे काम वेगाने सुरु आहे. आणखीन १३ नवीन उड्डाणपुल तयार करण्यात येतील. पुण्याची वाहतूक गतिमान करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. पुण्याचा विस्तार पाहिला तर , इथले मुख्य रस्ते पुर्व- पश्चिम आहेत तर उत्तर-दक्षिणेस पुणे गजबजलेले असून, उत्तर दक्षिण पुण्यातले रस्ते छोटे आहेत. त्यामुळे पुण्यात नवीन जागा तयार करू शकत नाही. म्हणूनच, पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आम्ही ‘पाताळ लोक’ तयार करणार आहोत .” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले .
“हे ‘पाताळ लोक’ म्हणजे जमिनीवरची जागा नाही. उड्डाणपूल बांधले त्यामुळे आकाशात जागा नाही. आता पाताळात जायचा निर्णय घेतला आहे. पुण्यात वाहतूक सुधारणा करण्यासाठी आम्ही पाताळात जाणार आहोत. जवळपास ५४ किमी भुयारी मार्ग म्हणजे ‘पाताळातील रस्ते’ पुण्यात तयार करणार आहोत.
त्यातलाच पहिला मार्ग कात्रजपासून सुरू करणार आहोत. त्यात येरवडा, स्वारगेट, सिंहगड, पाषाण, खडकी, कात्रज हा सर्व भाग समाविष्ट करणार आहोत. हे फक्त मी हवेत बोलत नाही तर त्याचा प्लॅन आणि नकाशा आम्ही तयार केला आहे.” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

“याच दरम्यान, हे भुयारी मार्ग तयार करणे, ३२ रस्त्यांचे विस्तारीकरण करणे तसेच नवीन येणारे उड्डाणपूल या माध्यमातून पुण्यातील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी चालना देऊ. जवळपास ३२ हजार कोटी रुपये हे ,आम्ही भुयारी रस्त्यांसाठी वापरणार आहोत. पुण्याला ‘रिंग रोड’ करत आहोत. यातील १२ पैकी ९ पॅकेजचं काम सुरू असून त्यासाठी ५७ हजार कोटी दिले आहेत.
१६९ किमीचा हा ‘रिंग रोड’ आहे. यामुळे पुण्यात येणारी वाहतूक तब्बल ४० % नी कमी होईल. यासोबत पुणे-नगर, पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक या रस्त्यावर ‘डबल-डेकर पूल’ तयार करण्यात येईल. यात खाली रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि त्यावरच्या पुलावर मेट्रो असा हा आराखडा आहे. म्हणून हे व्हिजन घेऊन आम्ही पुणेकरांसमोर आलो आहोत” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेत सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here