Home मुंबई *महानगरपालिका निवडणुकीसाठी विविध पथके स्‍थापन – महानगरपालिका आयुक्‍त तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी...

*महानगरपालिका निवडणुकीसाठी विविध पथके स्‍थापन – महानगरपालिका आयुक्‍त तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी श्री. भूषण गगराणी*   

112
0

*आचारसंहिता पथक (Code of Conduct Squad), स्थिर पाळत पथक (Static Surveillance Team), चित्रीकरण पाळत पथक (Videography Surveillance Team) आणि भरारी पथक (Flying Squad Team) आदींचा समावेश*

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ सुरळीत, पारदर्शक व नि:पक्षपाती पद्धतीने पार पाडण्‍यासाठी तसेच आदर्श आचारसंहितेची काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्‍याच्या उद्देशाने विविध भरारी पथकांची स्‍थापना करण्‍यात आली आहे. या पथकांसाठी पुरेसे व प्रशिक्षित मनुष्‍यबळ उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहे. भरारी पथकांतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नेमून दिलेली कर्तव्ये प्रामाणिकपणे, वेळेत व पूर्ण जबाबदारीने पार पाडावीत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन होणार नाही, याची सतत दक्षता घ्यावी तसेच आढळून येणाऱ्या उल्लंघनांवर तत्काळ व नियमांनुसार कारवाई करावी, असे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

माननीय राज्‍य निवडणूक आयोग, महाराष्‍ट्र यांनी जाहीर केलेल्‍या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्या कार्यक्रमानुसार गुरूवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. त्‍या अनुषंगाने संपूर्ण महानगरपालिका कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. त्‍यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात विभागनिहाय पथके स्‍थापन करण्‍यात आली आहेत. त्‍यात आचारसंहिता पथक (Code of Conduct Squad), स्थिर पाळत पथक (Static Surveillance Team), चित्रीकरण पाळत पथक (Videography Surveillance Team) आणि भरारी पथक (Flying Squad Team) आदींचा समावेश आहे.

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी म्‍हणाल्‍या की, “महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने एसएसटी, एफएसटी आणि व्हीएसटी पथके नेमण्यात आली आहेत. निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. त्‍यामुळे सर्व पथकांनी निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी दक्ष राहावे. पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचा-यांनी देखील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी समन्वय साधून कामकाज करावे. निवडणूक शांततेत व सुरळित पार पाडणे ही मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. यासाठी महानगरपालिका प्रशासन इतर यंत्रणांसमवेत समन्वयाने कामकाज करत असल्‍याचे, डॉ. अश्विनी जोशी यांनी नमूद केले.

महानगरपालिका आयुक्त गगराणी म्‍हणाले की, “प्रत्येक प्रशासकीय विभागात विभागीय सहायक आयुक्त यांच्या अधिपत्याखाली आचारसंहिता पथक कार्यरत आहे. आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनासंदर्भात नागरिकांना कोणतीही माहिती किंवा तक्रार संबंधित विभाग कार्यालयातील आचारसंहिता कक्षाशी थेट संपर्क साधून नोंदविता येईल.

मतदारांवर प्रभाव पाडतील किंवा प्रलोभन ठरतील अशा वस्तुंची, पैशांची, मद्याची व शस्त्रास्त्रांची अवैध मार्गाने वाहतूक होऊ शकते, अशा ठिकाणच्या नाक्यावर स्थिर पाळत पथक नेमण्यात आले आहे. हे पथक निश्चित ठिकाणी (चेक पोस्ट) तैनात करण्यात आले आहे. रोख रक्कम व मद्याची बेकायदेशीर वाहतूक, शस्त्रसाठ्याची वाहतूक यांवर नजर ठेवण्याचे महत्‍त्‍वपूर्ण काम स्थिर पाळत पथकामार्फत करण्‍यात येत आहे. त्‍याचप्रमाणे मतदारांवर प्रभाव पाडतील किंवा प्रलोभन पाडतील अशा प्रकारांवर देखरेख करण्‍यासाठी तसेच पैशांची व मद्यांची अवैध मार्गाने वाहतूक वा अन्य संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकेदेखील तैनात करण्यात आली आहेत. ही पथके प्रभागात फिरुन स्थिर पाळत पथकाप्रमाणेच कार्यवाही करत आहेत. या पथकांनी योग्य ती तपासणी करावी, आवश्यक असल्‍यास जप्तीची प्रक्रिया करत कायदेशीर कार्यवाही करावी. तसेच आचारसंहिता भंगाची घटना निदर्शनास आल्यास या संदर्भातील माहिती संबधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित पोलीस ठाण्‍यास तात्काळ देण्यात यावी, असे निर्देश देण्‍यात आल्‍याचे श्री. गगराणी यांनी नमूद केले.

याखेरीज, निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये घडणाऱ्या महत्वाच्या घटना, प्रचार फेऱ्या, सभा, तसेच अवाजवी खर्चाबाबत आणि तत्सम आचारसंहितेच्या भंग होणाऱ्या घटनांबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांना विनाविलंब माहिती देणेसाठी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर चित्रीकरण पाळत पथक (Videography Surveillance Team) कार्यरत आहे. आचारसंहितेच्या कालावधीमध्ये निवडणूक क्षेत्रामध्ये घडणा-या घटना / मिरवणुका, प्रचार फे-या, सभा अथवा आचारसंहितेचा भंग होईल अशा घटनांचे व्हिडिओ चित्रिकरण करण्याचे व त्‍याबाबतची माहिती आचारसंहिता पथकप्रमुख व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना देण्याचे निर्देश देण्‍यात आले आहेत. उपरोक्त कामे पार पाडण्यासाठी पथक प्रमुखांनी स्वतः लक्ष ठेवावे, नियुक्त पथकातील अधिकारी / कर्मचारी यांनी एकमेकांशी समन्वय साधून काम विहित वेळेत पूर्ण करून घ्यावे. निवडणुकीच्या कामात हयगय अथवा निष्काळजीपणा केल्याचे निदर्शनास आल्यास नियमातील तरतुदीनुसार शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात येईल.” असे गगराणी यांनी सांगितले.

महानगरपालिका आयुक्त गगराणी म्‍हणाले की, “उमेदवारांना विविध विभागांकडून घ्याव्या लागणाऱ्या सर्व प्रकारच्या परवानग्या सुलभपणे व वेळेत मिळाव्यात यासाठी एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रत्येक विभाग कार्यालयात स्वतंत्रपणे फेऱ्या मारण्याची आवश्यकता राहणार नाही. महानगरपालिकेच्या विविध विभागांसह अग्निशमन विभाग, अनुज्ञप्ती विभाग, पोलीस विभाग, वाहतूक पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या आवश्यक परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्‍याद्वारे प्रशासकीय प्रक्रिया अधिक गतिमान आणि कार्यक्षम करण्‍यात आली आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here