- एमएमआरडीए भागात सीटीफ्लोच्या ४ हजार ६०० बसेस, परवाना नाही, कुठेही पार्किंग पण सरकारकडून कारवाई नाही.
सीटी फ्लोच्या मागे ठाण्यातून मोठा आशिर्वाद, ठाणे, मलबार हिलचा बंगला व आरटीओला सीटीफ्लोकडून कोट्यवधी रुपयांचे हप्ते.
बेस्ट बचावसाठी काँग्रेसचा ९ कलमी कृती आराखडा जाहीर, काँग्रेसची महानगरपालिकेत सत्ता आल्यास बेस्टमध्ये ६ हजार बसेस आणणार.
मुंबई, दि. ४ जानेवारी ..
“बेस्ट बस ही मुंबईकरांची जीवनवाहिनी असून लाखो मुंबईकर बेस्टमधून प्रवास करतात पण सत्ताधारी भाजपा महायुती सरकार बेस्ट सेवाच मोडीत काढत आहे. बेस्ट व बेस्ट कर्मचारी यांचे खच्चिकरण सुरु आहे. बेस्ट बस सेवा मोडीत काढून खाजगी कंपनीला रान मोकळे करून देण्याचा घाट घातलेला आहे. मुंबई काँग्रेसने बेस्ट बचाव मिशन हाती घेतले असून महानगरपालिकेत सत्ता आल्यास बेस्टच्या ताफ्यात ६ हजार बसेस आणल्या जातील.” असा विश्वास मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा एकनाथ गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते आज बेस्टचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला तसेच महायुती सरकारच्या जनविरोधी योजना व बेस्ट मधील भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत, आमदार अमिन पटेल व मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, महानगरपालिकेच्या विविध संस्थांचे खाजगीकरण करण्याचा महायुतीने सापाटा लावला आहे. यातील मुंबईकरांसाठी महत्वाची असलेली बेस्ट बस सेवा बंद करण्यासाठी मोठे षडयंत्र सुरु आहे. सीटीफ्लो या खाजगी कंपनीच्या एमएमआरडीए भागात तब्बल ४६०० बसेस सुरु आहेत. या बसेसना परिवहन विभाग, आरटीओ वा सरकारची कोणतीही परवानगी नाही. या बसेसना ईस्टर्न फ्री वेवर परवानगी आहे पण इतर बसेसना नाही, सीटीफ्लोच्या बसेस कोठेही पार्क केलेल्या असतात, आरटीओनी काही बसेसना दंड ठोठावला, हा २ लाख ५० हजारांचा दंड रद्द करावा यासाठी मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. सीटीफ्लोच्या मागे ठाण्यातील बड्या नेत्यांचा वरदहस्त आहे. ठाण्यातील बंगला, मलबार हिलचा बंगला व आरटीओ यांना सीटीफ्लो कडून कोट्यवधी रुपयांचे हप्ते दिले जातात, असा गंभीर आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
खासदार गायकवाड पुढे म्हणाल्या की, “आम्ही सीटीफ्लो बसेसच्या संदर्भात दोनवेळा पत्र व्यवहार केला, विधिमंडळात काही आमदारांनी प्रश्न उपस्थित केले पण अद्याप कोणताच अहवाल राज्य सरकारकडे आलेला नाही. या सीटीफ्लो मुळे बेस्टची एससी बस सेवा बंद पडली आहे. हा सर्व प्रकार थांबवला पाहिजे व बेस्ट सेवा सुरुळीत चालली तर मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारेल व वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल.” असे खासदार गायकवाड म्हणाल्या.
यावेळी सचिन सावंत म्हणाले की, “महानगरापालिका निवडणुकीत मुंबईकरांच्या समस्या व प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे, प्रत्येक राजकीय पक्षाने मुंबईकरांसाठी काय करणार हे सांगितले पाहिजे पण भाजपा मात्र विकासाची चर्चा न करता विवाद निर्माण करत आहे, लोकांचे लक्ष मुलभूत प्रश्नापासून दुसरीकडे वळवण्याचा त्यांचा डाव आहे. मुंबईकराना काम हवं आहे, सुविधा हव्या आहेत. वायु प्रदुषण ही मुंबईतील मोठी समस्या आहे. हायकोर्टाने याबाबतीत राज्य सरकार व बीएमसीला झापले आहे. मुंबई काँग्रेसने या विषयवर वेगळा जाहिरनामा प्रसिद्ध केलेला आहे. दुसरी महत्वाची समस्या आहे बेस्ट सेवेची. बेस्टवर लाखो मुंबईकर अवलंबून आहेत. परंतु या बेस्टला ग्रहण लावण्याचे काम केले जात आहे. बेस्टमध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. बेस्ट वाचली पाहिजे यासाठी काँग्रेसने बेस्ट बचाव मिशन हाती घेतले आहे.” असे सचिन सावंत यांनी सांगितले.






















