‘थर्टी फर्स्ट म्हटलं की दारू मस्ट’ हे जणू एक समीकरण झालं आहे. यात सर्व वयाचे असले तरी दारूचा पहिला घोट घेणाऱ्या तरुणाईचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.ही बाबत चिंताजनक असल्याने अन्वय व्यसनमुक्ती केंद्रातर्फे प्रतिवर्षी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
रा. फ. नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती या विषयावरील सादर केलेल्या प्रभावी पथनाट्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. लोकगीत गायक, शाहीर नंदेश उमप, गॅलेक्सी परफॅक्टंट्स लि.चे सी एस आर प्रमुख कर्नल अमरजीत दास, नवी मुंबईतील प्रख्यात मानसोपचार तज्ञ डॉ राकेश गिल्डि,याल या पाहुण्यांसमोर हे पथनाट्य सादर झाले. याआधी निवेदिका डॉ मृण्मयी भजक यांनी शिक्षक मधुकर वारभुवन यांच्या तुर्भे येथील महानगरपालिका शाळेतील चार विद्यार्थ्यांना मंचावर बोलावले. नवीन वर्षाचे स्वागत कसे केले जाते याचे. कथन करताना जे अतिशय विदारक वास्तव मांडले ते सर्वांनाच हादरवून सोडणारे होते.
प्रास्ताविकात डॉ अजित मगदूम यांनी व्यसनान संबंधी काही आकडेवारी देऊन छुप्या जाहिरातींचे वास्तव समोर आणले.
डॉ राकेश गिल्डियाल यांनी के ई एम येथील व्यसनमुक्ती केंद्रातील अनुभव सांगत शाळकरी विद्यार्थ्यांनी एक गंमत किंवा प्रयोग म्हणून आणि काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी आपण मोठे झालो आहोत म्हणून सिगारेटची किंवा दारूची पहिली चव घेणे पुढे किती महागात पडते हे सांगितले त्यामुळे असे प्रयोग अजिबात करू नयेत असे आवाहन त्यांनी केले.
कर्नल अमरजीत दास यांनी आपल्या जीवनात शिस्तीला अतिशय महत्त्व असून कोणत्याही परिस्थितीत व्यसनजन्य पदार्थ सेवन करता कामा नये. विविध खेळ ट्रेकिंग पोहणे यात आपला काही वेळ व्यतित केला तर ते अतिशय लाभदायक ठरते आपल्या जवळच्या नातेवाईकांना मान द्या, त्यांचे धन्यवाद माना असे आवाहन केले.
मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी यांनीही विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून अलिप्त रहावे असे आवाहन केले.
पोवाडे गाऊन महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन प्रेरित करू पाहणारे आजच्या युवकांचे प्रेरणास्थान नंदेश उमप यांनी सुरुवातीला गरीब वस्तीतच व्यसनांचे प्रमाण इतके का हा प्रश्न करत गरिबांच्या हातात दगड देण्यापेक्षा काम किंवा पुस्तक द्या असे राज्यकर्त्यांना आवाहन केले. माणसं जोडा माणसं जिंका असं सांगत कोणताही छंद जोपासा दारू आपल्याजवळ येणार नाही असे सांगत काही गीते सादर केली शेवटी महाराष्ट्र गीत सादर करून विद्यार्थ्यांच्यात एक चैतन्य निर्माण केलं.
कार्यक्रमाच्या अखेरीस वृषाली मगदूम यांनी उपस्थितांचे यथोचित आभार मानले. प्राचार्य रवींद्र पाटील, प्राचार्य प्रताप महाडिक, डॉ जगदाळे, आप्पा ठाकूर, मधुकर राऊळ, प्रा अश्विनी बाचलकर , वसंत वळकुंडे इत्यादी कार्यक्रमास हातभार लावणाऱ्या हितचिंतकांचे ऋण व्यक्त केले. याप्रसंगी अन्वयचे कार्यकर्ते मुक्ता महापात्रा, मल्लिका सुधाकर, मनोहर तांडेल, प्रज्ञा बडवे, पुष्पा कांबळे, ज्ञानेश्वर भोगले, अवनी म्हात्रे, जालिंदर यमगर, राजश्री जानकर आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
परिश्रम घेतले.



















