पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पिंपरी चिंचवडमधील धनाढ्य उमेदवारांनी यंदा निवडून येण्यासाठी प्रचंड आर्थिक ताकद लावली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या असल्या तरी, इच्छुकांनी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी मोठ्या आणि महागड्या भेटवस्तूंचा (आमिषांचा) धडाका लावला आहे. पुण्यात महापालिका निवडणुकीत इच्छूक उमेदवार मतदारांना विकासाची नाही तर अनेक महागड्या गोष्टींची प्रलोभनं दाखवून आश्वस्त करताना दिसत आहेत. यापैकी काही उमेदवारांनी चारचाकी गाडी, थायलंडची पाच दिवसांची टूर, एक गुंठा जमीन अशा ऑफर्स दिल्या जात आहेत. वाढत्या स्पर्धेमुळे आणि उमेदवारी मिळवण्यासाठी स्वतःची ताकद दाखवण्यासाठी इच्छुक अशा प्रकारे कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत.
निवडणुकीतील उमेदवारांकडून देण्यात आलेल्या प्रमुख ऑफर्स आणि भेटवस्तू
कसब्यात प्रभाग क्रमांक २५ मध्ये पैठणीचा खेळ जिंकणाऱ्या महिलांना थेट बक्षीस म्हणून हेलिकॉप्टर राईड देण्यात येणार आहे.
* जमिनीचे प्लॉट: प्रभाग क्रमांक १ (लोहगाव-धानोरी) मध्ये एका इच्छुकाने चक्क ११गुंठे जमिनीचे प्लॉट (प्रत्येकी११०० स्क्वेअर फूट) लकी ड्रॉद्वारे देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासाठी नोंदणी प्रक्रियाही राबवली गेली.
* परदेशवारी: प्रभाग क्रमांक ३ (विमाननगर) मध्ये काही इच्छुकांनी जोडप्यांसाठी थायलंड (फुकेत-क्राबी) सहलीचे आयोजन केले आहे. ही सहल पाच दिवसांची असल्याचे सांगण्यात आले आहे.
* वाहने आणि सोन्याचे दागिने: अनेक प्रभागांमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एसयूव्ही (SUV) कार, दुचाकी (टू-व्हीलर) आणि महागड्या वस्तूंचे वाटप केले जात आहे.
* पैठणी साड्या: महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘होम मिनिस्टर’ सारखे कार्यक्रम आयोजित करून मोठ्या प्रमाणावर पैठणी साड्यांचे वाटप करण्यात आले आहे.
* क्रीडा स्पर्धा आणि बक्षिसे: क्रिकेट लीग आयोजित करून त्यात 1 लाख रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे आणि इतर मोठी पारितोषिके दिली जात आहेत.
* दैनंदिन वस्तू: काही प्रभागांमध्ये महिलांना शिवणयंत्रे, तर मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले आहे.


















